Premium

मुख्यमंत्र्यांच्या दिवा दौऱ्यावेळी भाजप भरविणार बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन, दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

दिव्यातील शिवसेना (शिंदे गट )आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

chief minister eknath shinde to visit in diva
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

शिवसेनेच्या  (शिंदे गट ) स्थानिक नेत्यांवर भाजपचे गंभीर आरोप

ठाणे : दिवा शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने गाजत असतानाच, भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शहर बकाल होण्यास शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यानिमित्ताने दिव्यातील शिवसेना (शिंदे गट )आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> स्वत:शी प्रामाणिक राहून निवडलेला मार्ग हाच यशस्वी ‘करिअर’चा मूलमंत्र; राजेश नार्वेकर यांचे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत प्रतिपादन

राज्यात शिवसेना (शिंदे गट )आणि भाजप एकत्रित सत्तेवर असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील दिवा परिसरात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये फारसे पटत नसल्याचे चित्र आहे. या नेत्यांमध्ये असलेले विळा भोपळ्याचे नाते पुन्हा एकदा समोर आले आहे. दिवा शहर बकाल होण्यास शिवसेना (शिंदे गट) दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

दिवा शहरात पाण्याचा मोठा प्रश्न असतानाही पिण्याचे पाणी बेकायदा बांधकामांना देण्यात येत आहे.  आर्थिक लाभासाठी येथील प्रशासन व स्थानिक शिवसेना बेकायदा बांधकामाचा भस्मासुर उभा करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी देऊनही पालिका प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई करत नसून त्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार आहे. पुराव्यांसह तक्रारी करूनही बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याची गंभीर बाब मुख्यमंत्री शिंदे आणि राज्याच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे क्लस्टर योजना होत असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकाम जोमाने वाढत असल्याने क्लस्टर योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात शिवसेना (शिंदे गट) दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आगीत मिलेनियम आर्केडमधील सदनिका जळून खाक

स्लॅब मागे ३ लाख रुपये दिव्यातील नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. स्लॅब मागे ३ लाख रुपये घेऊन दिवा शहरात बेकायदा बांधकामे जोमाने सुरू आहेत. याला आयुक्त, पालिका अधिकारी प्रितम पाटील आणि दिव्यातील शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 13:28 IST
Next Story
स्वत:शी प्रामाणिक राहून निवडलेला मार्ग हाच यशस्वी ‘करिअर’चा मूलमंत्र; राजेश नार्वेकर यांचे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत प्रतिपादन