कल्याण लोकसभेसाठी भाजप उमेदवारासाठीच काम करणार, डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेला इशारा

डोंबिवली- मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यापासून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा हद्दीत भाजप, मनसेला आक्रमकपणे शह देण्याची वृत्ती भाजप, मनसे कार्यकर्त्यांच्या खूप जिव्हारी लागली आहे. आता तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खास समर्थक नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात खा. शिंदे यांचा हात असल्याची जोरदार चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या गुन्ह्याचे उट्टे काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण मधील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण काय बोलतोय, यापेक्षा मी माझ्या विकास कामांच्या बळावर पुढे जाईन, असे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे स्पष्टीकरण देत असले तरी, डोंबिवलीतील काँक्रीटीकरणाची कामे अतिशय निकृष्ट, रहिवाशांना त्रास होईल अशा पध्दतीने संथगतीने सुरू आहेत. याकडे खासदारांचे लक्ष आहे का, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. आमचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली मतदारसंघ असुनही येथील विकास कामे, सार्वजनिक कार्यक्रमांत, फलकांवर नेहमीच स्थानिक आमदार म्हणून मंत्री चव्हाण यांना दुय्यम वागणूक शिवसेनेकडून विशेषता खासदारांकडून देण्यात आली आहे, असे डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते सांगतात.

हेही वाचा >>>ठाणे: चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले

पालिकेतील भाजप नगरसेवकांच्या नस्ती मंजूर होणार नाहीत. रस्ते कामांचे श्रेय या विषयांवरुन खासदारांनी नेहमीच पुढारपणा करुन मंत्री चव्हाण यांना ‘पाण्यात’ पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते सहन करणार नाहीत. येत्या काळात भाजपचा लोकसभेसाठी उमेदवार असेल तरच आम्ही काम करू, असे स्पष्ट संकेत देत, येत्या काळात खा. शिंदे यांनी फक्त निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना डोंबिवलीतील भाजप मताधिक्याची नक्कीच जाणीव करुन देण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला.

हेही वाचा >>>ठाण्यात समूह विकास मार्गी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या प्रकल्पास प्रारंभ

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे खासदारांशिवाय कोणाही नेते, मंत्रीगणांची फार दखल घेत नव्हते. या रागातून भाजपचे जोशी यांच्यावर खासदारांच्या इशाऱ्यावरुनच गुन्हा दाखल झाला, याविषयी भाजप कार्यकर्ते ठाम आहेत. जोशी यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावरील मोर्चात मनसेचे कार्यकर्ते भाजपच्या खांद्याला खांदा लावून हजर झाले होते. युती धर्माची भाषा करणारी शिवसेना यामध्ये का सहभागी झाली नाही, असा प्रश्न भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला.

“नंदू जोशी यांच्यावर कोणाच्या दबावावरुन गुन्हा दाखल झाला हे सर्वदूर माहिती आहे. युतीधर्म म्हणून आम्ही नेहमीच शिवसेनेला साथ दिली. त्याचे परतफेड भाजप पदाधिकाऱ्याला बदनाम, आमच्या नेत्याचे खच्चीकरण करुन करण्यात येत असेल तर यावेळी लोकसभेसाठी भाजप उमेदवारासाठीच आम्ही काम करू. याविषयी कार्यकर्ते ठाम आहेत. उड्या मारणाऱ्यांची ताकद काय आहे ती पण यावेळी आम्ही दाखवून देऊ.”-शशिकांत कांबळे,जिल्हाध्यक्ष,,भाजप, कल्याण.

“दोन सख्खे भाऊ छोट्या कुरबुऱ्या होतातच, पण वेळेला एकत्र येतात. मोर्चात सहभागी होण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करुन आम्हाला आदेश असते तर आम्ही गेलो असतो. कुऱबुऱ्यांकडे कधी कानाडोळा करायचा असतो. फार गंभीर घ्यायचे नसते.-राजेश कदम,उपजिल्हाप्रमख,शिवसेना.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp workers in dombivli warned shiv sena that they will work only for bjp candidate for kalyan lok sabha amy
First published on: 05-06-2023 at 13:15 IST