ठाणे : राज्यात शिवसेना गट आणि भाजपने एकत्रित येऊन नवे युतीचे सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कार्यालयाबाहेर जल्लोष केला. ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांनी नवे सरकार स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद हुकल्याची खंत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तसेच विधान परिषद निवडणुक विजय जल्लोषावेळी कार्यकर्त्यांची जेवढी गर्दी होती. त्या तुलनेत या जल्लोषावेळी कार्यकर्त्यांची कमी गर्दी होती. त्यामुळे जल्लोषाकडे काही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेच्या बंडाचे केंद्रबिंद असलेले एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेेते देवेंद्र फडणवीस हे एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील असे जवळपास स्पष्ट झाले होते. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील, असे अंदाज वर्तविले जात होते. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, सरकार स्थापनेवेळी नेमके उलटे घडले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे नवे सरकार स्थापन झाल्याचा आनंद भाजप कार्यकर्त्यांना झाला असला तरी फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद हुकल्याची खंत कार्यकर्त्यांकडू्न व्यक्त होत आहे. हेच चित्र ठाण्यातील भाजपने नवे सरकार स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या जल्लोष कार्यक्रमात दिसून आले.

ठाणे येथील खोपट भागातील भाजप कार्यालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत नवे सरकार स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावे‌ळी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद हुकल्याची खंत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तशी चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती. विधान परिषद निवडणुक विजयानंतर अशाच प्रकारचा जल्लोष कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, नवे सरकार स्थापनेच्या जल्लोष कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह काही माजी नगरसेवक उपस्थित नव्हते. तसेच त्यादिवशीपेक्षा या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची गर्दी कमी होती.