ठाणे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगत असलेले आणि मुंबई महानगरातील सर्वात महत्वाचे शहर असलेल्या ठाणे शहरात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट झाल्याची बाब बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आली. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डाॅक्टरांच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक होताच, अशा डाॅक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली.

या सभेच्या विषयपत्रिकेवर मानद डॉक्टर घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. त्यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी मानद डॉक्टरांच्या पॅनलसह आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटर याबाबत प्रश्न उपस्थित करत बोगस डाॅक्टरांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यापाठोपाठ शिंदे सेनेचे नगरसेवक रमाकांत मढवी यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. इतर राज्यातून अनेक डॉक्टर पदवी घेवून येतात आणि शहरात दवाखाने सुरू करत आहेत. त्यांची पदवी तपासली जात नसून यात अनेक बोगस डाॅक्टर आहेत. हे बोगस डाॅक्टर ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तसेच दिवा शहरातही दररोज नवनवीन दवाखाने उघडले जात असून त्याची तपासणी होताना दिसून येत नाही. शहरातील बोगस डाॅक्टरांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येता का आणि किती डाॅक्टरांवर कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मढवी यांनी केली. यावेळी दवाखाने नोंदणी कायदा आपल्याकडे लागू नाही. यामुळे दवाखान्यांची नोंदणी पालिकेकडे केली जात नसल्याचे डॉ. प्रसाद पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले. बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आल्याचा आरोप करत नगरसेवक आक्रमक झाले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रशासनाची बाजू मांडत, कारवाईचे आदेश दिले. प्रभाग समितीनिहाय डॉक्टरांचे पथक नेमण्यात येईल. या पथकाच्या माध्यमातून दवाखान्यांची तपासणी करण्यात येईल. यात बोगस डाॅक्टर आढळून आले तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे माळवी यांनी स्पष्ट करताच नगरसेवकांचा विरोध मावळला.

ठाणे पालिका क्षेत्रात ११ आयव्हीएफ केंद्र आहेत तर, २७ आयव्हीएफ केंद्र मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. पालिका, उपसंचालक विभागाने त्यांना परवानगी दिली आहे. परंतु पुण्याच्या विभागीय कार्यालयाची त्यांना मान्यता मिळालेली नाही. बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणानंतर २ मार्च पासून आयव्हीएफ केंद्राची ६ पथकांमार्फत तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर, पालिका क्षेत्रातील २५९ सोनोग्राफी सेंटरला १० पथकांमार्फत अचानक भेटी देऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती डाॅ. प्रसाद पाटील यांनी दिली.