कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी एका तोतया रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानाला बुधवारी अटक केली. हा तोतया जवान उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील इडा गावचा रहिवासी आहे. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकृत जवानाला हा तोतया जवान नजरेत आला. त्याची विचारपूस केल्यानंतर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाल्यावर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली.
अविनाश राजाराम जाधव असे त्याचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांचा गणवेश परिधान करून तो कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी मध्यरात्री गस्त घालत होता. रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेले कल्याण रेल्वे सुरक्षा बळातील जवान एकमेकांंना परिचित आहेत. बुधवारी संध्याकाळी सात ते पहाटे तीन या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेशसिंह यादव कल्याण रेल्वे स्थानकात गस्त घालत होते.
मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान रमेशसिंह यादव यांना खाकी गणवेश परिधान केलेला एक वर्दीतील रेल्वे सुरक्षा जवान कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटावर गस्त घालताना दिसला. फलाटावर दिवस, रात्र कोणाचे कर्तव्य असते याची माहिती रेल्वे सुरक्षा जवानांना असते. त्यामुळे फलाटावर अचानक हा खाकी गणवेशातील आरपीएफ जवान आला कोठून असा विचार करून रमेशसिंह यादव त्या जवानाच्या दिशेने गेले.
त्या जवानाला रमेशसिंह यांनी आपण कोणत्या विभागातील आरपीएफ जवान आहात अशी विचारणा केली. त्याने आपले नाव अविनाश राजाराम जाधव असे सांगितले. त्यावेळी त्याने आपण पुणे रेल्वे स्थानक भागात कर्तव्यावर असतो असे सांगितले. आपण वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पथकासह गस्तीवर असतो. त्यामुळे आपण याठिकाणी आलो आहोत असे रमेशसिंह यांना सांगितले. आपले गस्ती पथक स्कायवाॅकवर आहे, असे तो म्हणाला.
रमेशसिंह यांना त्याच्या बोलण्यावरून तो बनावट असल्याचे जाणवले. रमेशसिंह यांनी तोतया जवानाला घेऊन त्याचे पथक पाहण्यासाठी स्कायवाॅकवर गेले. तेव्हा त्यांना आरपीएफ जवान आढळले नाहीत. मग रमेशसिंह यांंनी त्या बनावट जवानाला तेथेच उभे करून ठेवले. आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सिंह यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. ते तातडीने पथकासह घटनास्थळी आले.
या तोतया जवानाला आरपीएफ अधिकाऱ्यांनी आरपीएफ रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी जवान मंगेश तेरे, रितेश त्रिपाठी, नीळकंठ गोरे यांंनी पाठलाग करून तोतया जवानाला पकडले. तो रेल्वे जवान असल्याचे दाखवून प्रवाशांची लुटमार करण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याचा ताबा रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. उपनिरीक्षक प्रमोद जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोणालाही संशय येणार नाही अशा पध्दतीने अविनाशने आरपीएफ जवानाचा गणवेश परिधान केला होता. त्यावर आरपीएफचा बिल्ला, नामपट्टी होती. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
