शाळेसह जबाबदार पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश

मुंबई : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या आपल्या ब्रीदवाक्याचा पोलिसांना विसर पडला आहे का? बदलापूर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब का झाला? दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला नाही? घटनेबाबत माहीत असून ती लपवणाऱ्या शाळेवर कारवाई का केली नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती करतानाच बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने संताप व्यक्त केला.

बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच शाळेत झालेला लैंगिक अत्याचाराचा प्रकार धक्कादायक असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. त्याच वेळी, घटनेच्या निषेधार्थ जनक्षोभ उसळल्यानंतर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबतही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने संताप व्यक्त केला व शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे बजावले. घटनेची माहिती लपवून प्रकरण दडपू पाहणाऱ्या शाळेवर आणि गुन्हा नोंदवण्यास विलंब करण्यासह दोनपैकी एका मुलीचा अद्यापही जबाब न नोंदवणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी सरकारला दिले. बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

dr ajit ranade continues as gokhale institute vc till october 7 bombay hc
डॉ. अजित रानडे हे ७ ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
High Court comment on Badlapur sexual assault case accused Akshay Shinde encounter Mumbai
हे एन्काउंटर नव्हे! उच्च न्यायालयाची टिप्पणी; थेट डोक्यात गोळी झाडण्याच्या कृतीवरही बोट
death case of pregnant women and newborn child in bhandup Court orders JJ Hospital authorities to explain
गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठत्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश
akshay shinde s father in high court
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण : पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात धाव
shambhuraj desai
मंत्री शंभुराज देसाईंकडून कायद्याची अवहेलना, उच्च न्यायालयाकडून नाराजी
Nagpur Bench of Bombay High Court Acquitted woman who arrested in naxalism case
नागपूर : नक्षलवादाच्या प्रकरणात अडवलेल्या महिलेची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका… पोलीस कारवाईवर प्रश्न
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

हेही वाचा >>> …‘या’ जखमा सायकल चालविल्याने झाल्या असतील! बदलापुरातील शाळा मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा

दोन्ही घटना अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडल्या. त्यानंतर, १६ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. परंतु एका मुलीच्या आईला तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तासनतास बसवून ठेवल्याचे उघड झाल्यानंतर घटना आणि पोलिसांच्या भूमिकेच्या निषेधार्थ जनआंदोलन झाले. त्यानंतर पोलीस यंत्रणेला आणि राज्य सरकारलाही जाग आली. जनक्षोभ उसळेपर्यंत तपास यंत्रणा किंवा राज्य सरकार अशा प्रकरणांत कारवाई करणार नाही का? असा प्रश्न विचारून न्यायालयाने यंत्रणांच्या कारभारावर ताशेरे ओढले.

बदलापूर पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करून हे धक्कादायक असल्याचे ताशेरे ओढले. तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर त्यांच्याच शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण पोलीस इतके निष्काळजीपणेकसे हाताळू शकतात? शाळाही सुरक्षित नसतील तर मुलींनी काय करावे ? तीन आणि चार वर्षांच्या मुलींनी काय करण्याची अपेक्षा आहे ? असे प्रश्न न्यायालयाने विचारले. पीडित अल्पवयीन मुलींना न्याय मिळेल याचाच विचार पोलिसांनी करायला हवा, असेही न्यायालयाने सुनावले. त्याचप्रमाणे, पीडित मुलींचे समुपदेशन करण्याचे आणि त्यांच्या पालकांना आणखी त्रास सहन करावा लागू नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले.

… तर जनता रस्त्यावर उतरणारच

या प्रकरणातील मुलींनी आणि त्यांच्या पालकांनीही घटनेबाबत वाच्यता केली म्हणून हा प्रकार उघडकीस आला. परंतु अशी अनेक प्रकरणे दुर्लक्षित राहतात. पोलिसांकडून त्यांना योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने मुली किंवा त्यांचे पालक अशा घटनांबाबत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे न्यायालयाने सुनावले. बदलापूर पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता आणि शाळा प्रशासनानेही घटनेची माहिती वेळीच पोलिसांना दिली असती तर त्याच्या निषेधार्थ जनता रस्त्यावर उतरली नसती.

या सगळ्यांचे स्पष्टीकरण द्या

गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब का केला ? दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला नाही ? तिच्या पालकांचा जबाब का नोंदवला नाही ? शाळेवर कारवाई का केली नाही ? या सगळ्यांचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. याशिवाय, आतापर्यंत शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या आणि काय करणार ? हेही स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

… तर संबंधितांवर कारवाईचा बडगा

शाळेने घटनेची तक्रार न करणे आणि घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात केलेली दिरंगाई यातून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सिद्ध झाले, तर संबंधितांवर कारवाई करण्यास धजावणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला.

तोदेखील गुन्हाच

शाळेच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती होती. त्यानंतरही त्यांनी मौन बाळगले आणि पोलिसांना माहिती दिली नाही. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्ह्याची तक्रार न करणे हा गुन्हा आहे. पोलिसांनीही अशा घटनांची नोंद न करणे हादेखील गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने पोलीस आणि सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतल्यानंतर शाळा प्रशासन आणि गुन्हा व मुलींचे जबाब नोंदवण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिले. त्यावर, जबाबदार पोलिसांवर निलंबनाची कारवाई पुरेशी नसल्याचे न्यायालयाने फटकारले.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडलेल्या दुर्देवी घटनेचा निषेध म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. राज्याला क्षमता नसलेला मुख्यमंत्री लाभला आहे हे दुर्दैव आहे. –उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात अत्याचारांच्या घटना घडल्या होत्या. त्यावर पांघरूण घालून ठाकरे बदलापूरच्या घटनेवरून राजकारण आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत. – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप, प्रदेशाध्यक्ष