scorecardresearch

घरातील टाकाऊ वस्तूंपासून ‘बुकमार्क’; डोंबिवलीत जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

पुस्तके वाचताना त्याची नीट हाताळणी व्हावी या उद्देशातून डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात दोन दिवसीय भव्य पुस्तक बुकमार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

ठाणे : पुस्तके वाचताना त्याची नीट हाताळणी व्हावी या उद्देशातून डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात दोन दिवसीय भव्य पुस्तक बुकमार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये घरातील टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले विविध आकर्षक असे ९४० बुकमार्क नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हे अनोखे प्रदर्शन भारतातले पहिले आहे, असा दावा लायब्ररीकडून करण्यात आला आहे. वाचकांना पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी आणि वाचनसंस्कृती जपली जावी यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररी अनेक वर्षांपासून अनेकविध अनोखे उपक्रम राबवित असते. यामध्ये पुस्तक अदान-प्रदान प्रदर्शन, लेखक बाल वाचक महोत्सव, बंधु कट्टा, फेंड्स कट्टा, तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान, संवाद असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. यंदा असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम या लायब्ररीने केला आहे.
अनेकदा पुस्तके वाचत असताना काही कारणास्तव व्यत्यय आला किंवा पुस्तक वाचून ठेवल्यानंतर पुस्तकाची पाने दुमडली जातात. त्यामुळे पुस्तके फाटण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पुस्तके वाचत असताना त्यामध्ये बुकमार्कचा वापर अनेक जण करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच पुस्तक हाताळताना बुकमार्कचा वापर केला पाहिजे. या हेतूने यंदा जागतिक पुस्तक दिनानिमित्त आगळेवेगळे बुकमार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यासाठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या लायब्ररीने जागतिक स्तरावर बुकमार्क स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांसह बंगळूर, दिल्ली, गुजरात, पुणे, नागपूर या भागांमधून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
घरातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ, लग्नपत्रिका, जाहिरातींचे खोके, रंगीबेरंगी कापड, झाडांची पाने, फुले यांपासून स्पर्धकांनी विविध आकर्षक असे सुमारे ९४० बुकमार्क तयार करून लायब्ररीमध्ये पोस्टाने पाठवण्यात आली.
विविध कल्पना, युक्त्या वापरून तयार करण्यात आलेल्या हे बुकमार्क नागरिकांना देखील पाहायला मिळावे, त्यासाठी जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीच्या पै फ्रेंड्स लायब्ररीने दोन दिवसीय भव्य पुस्तक बुकमार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी दिली.
पुस्तक प्रदर्शन आणि विक्री
दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने २३ आणि २४ एप्रिल दोन दिवसीय पुस्तक बुकमार्क प्रदर्शनाबरोबरच पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील कथा, कादंबरी, ललित, चरित्रपर, शेअर मार्केट अशा विविध विषयांतील सुमारे ५० हजार पुस्तके वाचकप्रेमींसाठी उपलब्ध असणार आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bookmarks household waste world book day exhibition dombivli pai friends library amy

ताज्या बातम्या