शहरबात : पश्चिम पट्टय़ावर जलसंकट

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील नागरिकांना सुर्या प्रकल्पाचे पाणी अद्याप मिळालेले नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

वसईच्या पश्चिम पट्टय़ामधील नागरिक ज्या विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहेत ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचे विविध चाचण्यांतून सिद्ध झाले आहे. विहिरींच्या पाण्यातील बेसुमार उपसा, त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा जमिनीत झालेला शिरकाव यामुळे हे पाणी क्षारयुक्त झाले आहे. त्याचे विविध दुष्परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होऊ  लागले आहेत. पण त्याचबरोबर शेतीचे उत्पन्नही कमालीचे घटले आहे. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाण्याची तूट राहणार असल्याचे एमएमआरडीएच्या आराखडय़ातून स्पष्ट होत आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील विहिरींचे पाणी दूषित झाल्याचा अहवाल एका सर्वेक्षणातून समोर आला आणि स्थानिक वसईकरांमध्ये घबराट पसरली. वसईतल्या विहिरींचे पाणी दूषित होणार असल्याचा इशारा पंचवीस वर्षांपूर्वीच देण्यात आला होता. त्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आज हा धोक्याचा इशारा खरा ठरला आहे. दूषित पाणी म्हणजे नेमके काय तर पिण्याच्या पाण्यात झालेल्या क्षाराचे आणि शरीराला अपायकारक असलेल्या घटकांचे वाढते प्रमाण. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील नागरिकांना सुर्या प्रकल्पाचे पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या गावातील नागरिक विहिरींचे पाणी पितात. हेच पाणी दूषित झालं आहे. पण केवळ पिण्याचं पाणी दूषित झालं म्हणून पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीलाही त्याचा फटका बसला आहे. या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीचं उत्पादन कमालीचं घटलं आहे. कमी उत्पादनाअभावी शेतकऱ्यांची संख्या घटली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी पाण्यासाठी लढा उभा राहिला तेव्हा विविध तज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांनी हा धोक्याचा इशारा दिला होता. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि आज पश्चिम पट्टय़ावर जलसंकट उभं राहिलं आहे.

विहिरींतील दूषित पाणी प्यायल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील वसईतील पश्चिम पट्टय़ातील ग्रामस्थांना विविध आजारांची लागण होत आहे. पाणी वाचवा या मोहिमेंतर्गत काम करताना वसईतील स्वाभिमानी वसईकर या सामाजिक संस्थेने दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर संशोधन केले. त्या वेळी त्यांना पाण्यातील हा बदल जाणवला. पाण्यातील वाढलेले क्षार, गढूळपणा, बदललेली चव निदर्शनास येऊ  लागली. त्यामुळे संस्थेचे कार्यकर्ते ऑल्विन रॉड्रीक्स यांनी पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत मुळगाव, रमेदीपासून ते बोळींज, राजोडी, आगाशी, नंदाखालसह वेगवेगळ्या गावांतील विहिरींतून ५० पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे नमुने त्यांनी तपासले. प्रत्येक पाण्याच्या नमुन्यावर आठ चाचण्या करण्यात आल्या. पाण्यात कुठले घटक आवश्यक आहेत आणि कुठले विषारी किंवा अयोग्य घटक आहेत ते तपासण्यात आले तेव्हा वसईतील पाणी पिण्यायोग्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केल्यावर पाण्यातील क्षाराचे प्रमाण हे ७०० पासून १५०० ते २००० मि.ग्रॅ. प्रति लिटपर्यंत तर पाण्यातील सामूचे (पाण्यातील घटक) प्रमाण ८.५ टक्क्यांपेक्षा आढळले. क्लोराइड आणि नायट्रेटचे वाढलेले प्रमाणही आढळले आहे. क्षार वाढल्याने शरीरातील किडन्यांसह विविध अवयवांवर, केसांवर परिणाम होतो. वाढलेल्या सामूमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मि.ग्रॅ. प्रति लिटपर्यंतही आढळले आहे. या घटकाचे जास्त प्रमाण लहान मुलांच्या व गरोदर स्त्रियांच्या आजाराला कारणीभूत ठरते. चाचणी करण्यासाठी पश्चिम पट्टय़ातील ५० ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेतले होते. एका नमुन्यावर आठ विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या.

वसईत सूर्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं पाणी शहरात आलं आहे. गावे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. गावात हे पाणी आणलं जाईल. लोकांना विहिरीऐवजी सूर्या प्रकल्पाचं नळाचं पाणी मिळेल. पण विहिरीतील दूषित पाण्याची समस्या ही इथेच सुटत नाही. कारण याचा परिणाम शेतीवरही होत आहे. गेल्या काही वर्षांतील घटलेले विविध पिकांचे उत्पन्न याची साक्ष देते. क्षारांच्या वाढीमुळे तसेच पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी शेतीचे उत्पादन घटत आहे. पूर्वी शेतीमधील आणि बागांमधील पाणी पश्चिमेकडील खाडीत वाहून जात असे. तेथून भाईंदरच्या खाडीत आणि उत्तरेकडे वैतरणा नदीत जात असे. आगाशी भागातील शेतकरी सांगतात की, जमिनीत पाणी साचल्याने केळींची मुळे कुजतात. क्षारांचे प्रमाण अधिक झाल्याने फिकट लहान पाने येतात. त्यामुळे फळे येत नाहीत. आगाशीतील जमिनीतील क्षाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीच परिस्थिती गास गावातील आहे. पिकांचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. टोमॅटोचा आकार अर्ध्यावर आला आहे. शेतकऱ्यांची संख्या कमालीने घटली आहे.

धोक्याची घंटा वाजली होती..

१९७६ मध्ये मृणाल गोरे यांनी माणिकपूर येथे पाणी परिषद भरवली होती. १९८८ पासून वसईतील पाण्याचा प्रश्न पेटू लागला होता. वसईच्या जमिनीतील गोडे पाणी खारे होऊ  लागल्याचा अंदाज १९८५च्या सुमारास लागला. तसा इशारा देणारा पत्रव्यवहार शासनाकडे करण्यात आला होता. माजी आमदार पंढरीनाथ चौधरी यांनी तसे लेख प्रसिद्ध केले होते. नव्वदच्या दशकात वसईच्या पश्चिम पट्टय़ातून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसा झाला होता. पाणी सम्राटांनी वसईच्या विहिरींवर आवाजरहित पंप बसवून घेतले होते. मध्यरात्री पाणी उपसा केला जात होता. उपशांमुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत जाते आणि समुद्राचे पाणी आत शिरत जाते. त्यामुळे पाणी खारे होत जाते असे जलतज्ज्ञ सांगतात. जुन्या संदर्भातील आकडेवारीनुसार १९९०च्या सुमारास वसईच्या पश्चिम पट्टय़ातून एक कोटी साठ लाख लिटर पाणी टँकरद्वारे उपसले गेले होते. त्यामुळे स्थानिक विहिरीतून पाण्याची पातळी हटली पण त्यात क्षाराचे प्रमाण वाढून पाणी दूषित झाले. तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सेन गवई यांनी सादर केलेल्या अहवालातही ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. त्यांनी पाणी उपसा बंद करण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर गिरीज, नवाळे, वाघोली येथील महिलांनी पाणी बचाओ आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन तहसीलदार जयंत राणे यांनी जमावबंदी लावून ३१ महिलांना अटक केली होती. त्या आंदोलनालाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. आगाशी विभागातून प्रखर विरोध असूनही शासनाने पाच विहिरी ताब्यात घेऊन १५ जून १९९४ पर्यंत विरार नगर परिषदेसाठी रोज ८० टँकर पाणी नेण्याचा निर्णय सक्तीने घेतला होता. १९९०मध्ये राज्य  सरकारने सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून वसईत आणले. पण काही वर्षांतच सिडकोने वसईला सिमेंटचे जंगल बनवले. भरतीचे पाणी समुद्रात जाण्याचे मार्ग बंद झाले.

९०च्या दशकात जेव्हा हरित वसई समिती निसर्ग वाचवा, विहिरीतील पाणी विकू नका, म्हणून गावभर सांगत फिरत होती तेव्हा लोकांनी ऐकले नाही आणि त्यामुळे हे संकट ओढावल्याचे समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी सांगितले. त्या काळात पाली ते अर्नाळा या हिरव्या पट्टय़ात असलेल्या विहिरीतील पाण्याची चाचणी झाली तेव्हाच पाणी दूषित होत चालल्याचे लक्षात आले होते. २०१० साली महापालिका आली. तेव्हा महापालिकेला असलेल्या विरोधामुळे पश्चिम पट्टय़ातील गावात नळजोडण्या येऊ शकल्या नव्हत्या आणि लोकांना विहिरीचेच पाणी प्यावे लागत आहे असे ते म्हणाले.

२० वर्षांत पाण्याची तूट भेडसावणार

वसई-विरार शहराला ६२२ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून सध्या ३०८ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावतेय. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखडय़ातच हा पाण्याचा धोका नमूद करण्यात आला आहे. पाण्याची तूट वाढत जाणार असून पुढील काही वर्षांत तब्बल ११५९ दशलक्ष लिटर्स पाण्याची तूट वसईकरांना भेडसावणार आहे.  वसई-विरार शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत २० लाखांच्या घरात गेली आहे. शहरात नव्या नव्या वसाहती उभ्या राहात आहेत. त्यामुळे पाण्याची मोठी कमतरता आतापासूनच निर्माण झालेली आहे. सध्या वसई-विरार शहराला सुर्या उसगाव, पेल्हार आणि पापडखिंड या धरणांतून पाणीपुरवठा होतो. तसेच विहिरी आणि बोरिंगमधून १९ दशलक्ष लिटर्स पाणी मिळते. वसई-विरारच्या २० लाख लोकसंख्येला ६२२ दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता असल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने २०१६ ते २०३६ या २० वर्षांसाठी प्रसिद्ध केलेल्या विकास आराखडय़ात म्हटले आहे. परंतु वसई-विरार शहरातील सध्या सर्व स्रोत मिळून केवळ ३२२ दशलक्ष लिटर पाणीच उपलब्ध आहे. म्हणजे सध्या वसई-विरार शहरात ३०८ दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. हा आराखडा २० वर्षांचा आहे. येत्या २० वर्षांत ११५९ दशलक्ष लिटरची तूट वसई-विरारला भेडसावणार आहे.

सुहास बिऱ्हाडे twitter- @suhas_news

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Borewell and well water in vasai west not safe for drinking

ताज्या बातम्या