साकेत पुलाची लवकरच दुरुस्ती

किशोर कोकणे

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या काळात सुरू करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या कामाविषयीचा आराखडा तयार केला जात असून त्यामुळे पुलावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ठाणे शहरात तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर मोठय़ा प्रमाणात कोंडीची भीती आहे.

उरण जेएनपीटीहून सुटणारी हजारो अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गे ठाणे, गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात. येथील साकेत पूल अरुंद असल्याने तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते.या पुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या काही महिन्यांत हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, हे काम हाती घेतल्यास किमान आठवडाभर कालावधी दुरुस्तीसाठी लागू शकतो. त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. सध्या तरी वाहतूक शाखेने या कामास परवानगी दिलेली नाही. यासंबंधीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काय होऊ शकते?

कल्याण, भिवंडी, डोंबिवली भागातील हजारो वाहनचालक साकेत पुलामार्गे माजिवडय़ाहून मुंबईकडे जातात. तर ठाण्यातील घोडबंदर येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणारे वाहनचालकही याच मार्गे नवी मुंबईत जात असतात. अवजड वाहनेही याच मार्गावरून गोदामाच्या दिशेने जातात. दुरुस्तीच्या कालावधीत हा मार्ग एकेरी सुरू केला तरी माजिवडा, कापूरबावडी या भागात कोंडी होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

साकेत पूल जुना झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. येत्या काही दिवसांत वाहतूक शाखेबरोबर बैठक घेऊन त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.

रमेश खिस्ते, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ