भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण: कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्या जवळील उल्हास खाडीवरील ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाला १२३ वर्ष पूर्ण झाली आहेत. कल्याण शहराचे ऐतिहासिक महत्व ओळखून या लोखंडी पुलाचे जतन आणि संवर्धन करावे. लोखंडी पूल उभारणीतील एक उत्कृ्ष्ट नमुना म्हणून पुलाचा परिसर स्मार्ट सिटी प्रकल्पातून पर्यटन स्थळ म्हणून विकासित करण्याची मागणी शहरातील वास्तुविशारद, जाणकारांकडून पुढे आली आहे.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Mumbai Demolition bungalow
मुंबई : १२४ वर्षे जुन्या बंगल्याचे पाडकाम, मंगळवारपासून कारवाईला सुरुवात

ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाचे संवर्धन करुन तेथे पर्यटन स्थळ विकसित करावे म्हणून एक प्रस्ताव शहरातील जाणकारांकडून पालिका प्रशासनाला देण्यात येणार आहे. यात अरुण सपकाळे, निखील चौधरी, अविनाश हरड या वास्तुविशारदांचा सहभाग आहे. दुर्गाडी खाडी किनारी पालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नौदल संग्रहालय उभारण्यात येत आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दुर्गाडी जवळील खाडीवरील पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा जुना लोखंडी पूल सुशोभित करुन तेथे पर्यटनाच्या सुविधा देण्याची आणि वारसा वास्तू म्हणून पूल जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-वाढत्या उष्म्यात अघोषित भारनियमनाचेही चटके, ठाण्याच्या अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडीत  

आतापर्यंत भिवंडी बाजुने कल्याण शहरात प्रवेश करताना आधारवाडी कचराभूमीचे ढीग, तेथील दुर्गंधी दर्शन देत होती. लोखंडी पूल, नौदल संग्रहालय विकसित झाल्यावर शहराचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास कल्याण शहराच्या इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले.

कल्याण ऐतिहासिक शहराचा अभ्यास करताना डॉ. श्रीनिवास साठे यांनी राज्याच्या, देशाच्या विविध भागात जाऊन काही दस्तऐवज शोधले. त्याचे संदर्भ घेऊन पुस्तके लिहिली. अशाच एका जुन्या ग्रंथालयात कल्याण शहराचे संदर्भ शोधत असताना साठे यांना कल्याण मधील ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाची माहिती मिळाली. सार्वजनिक बांधकामाने विभागाने बांधलेल्या या लोखंडी पुलाविषयीची ६२ पत्रे, २०० कागदपत्रांचे दस्तऐवज साठे यांना मिळाले.

लोखंडी पुलाची उभारणी

१०० वर्षापूर्वी भिवंडीकडून कल्याणमध्ये येणाऱ्या नागरिकांना दुर्गाडी जवळ उल्हास खाडीचा अडथळा होता. भिवंडीकडून लोक बैलगाडी, पायी कल्याण खाडीजवळ येऊन तेथून तराफ्याने, बोटीने ते दुर्गाडी जवळ उतरुन मग कल्याण रेल्वे स्थानक, बाजारपेठेत जात होते. पावसाळ्यात अनेक वेळा हा जलमार्ग बंद असायचा. यामध्ये नोकरदार वर्गाचे अधिक हाल होते. १९०७ मध्ये भिवंडी परिसरातील लोकांनी खाडीत पुलाची उभारणी झाली पाहिजे म्हणून सरकार दरबारी मागणी सुरू केली. कल्याण मधील जाणते घनवटकर भाऊसाहेब यांच्या घरी भिवंडी भागातील नागरिकांची एक बैठक झाली. पुलाच्या उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला गेला. रेल्वेला या पुलाचा फायदा नसल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल उभारणीचे काम १९०८ मध्ये हाती घेण्याचा निर्णय घेतला. पुणे, रायगड, ठाणे, गुजरात प्रांत जोडण्यासाठी हा पूल महत्वाचा होता. दरम्यानच्या काळात पहिल्या महायुध्दाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली होती. लष्करी सामग्री पुणे येथे वाहून नेण्यासाठी पूल लाभदायक होईल असा विचार करुन या पुलाची उभारणी झाली. अभियंते पी. के. चितळे, उनावाला यांचे सर्व्हेक्षण अहवाल महत्वाचे ठरले.

आणखी वाचा-तीन हात नाक्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची चिन्हे; पूर्व द्रुतगती महामार्गावरील भुयारी मार्ग लवकरच होणार खुला

रिचर्डसन ॲन्ड क्रुडास गार्लिक कंपनीने पूल उभारणीचे काम हाती घेतले. चार लाख ५० हजार रुपये खर्चाचे हे काम होते. अकराशे फूट लांबीच्या खाडीवर १०५ टप्पे करुन पुलावर तुळया टाकण्यात आल्या. १९१० पुलाचे काम सुरू होऊन १९१४ मध्ये पूर्ण झाले. पूल पूर्ण होईपर्यंतचा खर्च सहा लाखावर गेला. पुलाचे बिडाचे आधारस्तंभ खांब १२५ फूट लांबीचे आहेत. ४० फूट खांब वर, ७५ फूट खांब भूमिगत आहेत. हॉक टाईप पध्दतीचे पूल ब्रिटिशांनी अहमदाबाद, साबरमती, सुरत, एलिस ठिकाणी बांधले आहेत. या पुलाच्या सांधेजोडसाठी दोन लाख खिळे लागले आहेत. पुलाची पूर पातळी २० फूट आहे. २६ जुलैच्या महापुरातही पाणी पुलापासून २० फूट खाली होते. या पुलाचे स्मारक म्हणून जतन केले तर एक ऐतिहासिक ठेवा म्हणून पूल नावारुपाला येईल, असे साठे यांनी सांगितले.

“दुर्गाडी जवळील जुना लोखंडी पूल आरमार सेतू म्हणून पालिकेने विकसित करावा. एक पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण नावारुपाला येऊ शकते.” -डॉ. श्रीनिवास साठे, इतिहासाचे अभ्यासक, कल्याण.

“तांत्रिक संरचनात्मक उभारणीतील हा पूल म्हणजे एक अद्भूत नमुना आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना हा ठेवा मार्गदर्शक आहे. वारसा वास्तु म्हणून हा पूल जतन करुन पर्यटन स्थळ म्हणून पालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.” -अरुण सपकाळे, वास्तुविशारद.