येथील सुभाषवाडी परिसरात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेचे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने लुटल्याच्या प्रकार समोर आला आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. अंबरनाथ पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अंबरनाथ मधील सुभाषवाडी परिसरातील फातिमा शाळेजवळील घरात एक ७४ वर्षीय महिला राहते. ही वयोवृद्ध महिला मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घरी एकटी होती. यावेळी त्यांना घराच्या आवारात कोणीतरी लपून बसल्याचे निदर्शनास आले. ते बघण्याकरिता गेले असता एका व्यक्तीने जबरदस्तीने घरात घुसून त्यांच्या पाठीला चाकू लावला.

हेही वाचा >>> ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढण्याच्या प्रयत्न केला. महिलेने साखळी काढण्यापासून चोराला थांबविले असताना चोर आणि महिलेत झटापट झाली. या झटापटीत महिलेच्या हाताला दुखापत झाली. दुखापत झाल्याने महिलेने ओरडण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची साखळी आणि मंगळसूत्र खेचून घेऊन चोरट्याने घरातून पोबारा केला. या घटनेनंतर महिलेने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.