डोंबिवली- घरच्या लाडक्या पाळीव श्वानाला डोंबिवली जवळील दावडी गावातील तलावावर आंघोळीसाठी घेऊन गेलेल्या बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. कीर्ति रवींद्रन, रणजित रवींद्रन अशी बुडून मरण पावलेल्या भाऊ बहिणीचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर मध्ये रवींद्रन कुटुंब राहते. या दोघांचे आई, वडील गावी गेले आहेत. हेही वाचा >>> उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुखाची निर्घृण हत्या; पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळीने केली हत्या घरी कोणी नसल्याने कीर्ति, रणजित यांनी घरातील पाळीव श्वानाला आंघोळ घालण्यासाठी दावडी येथील तलावावर जाण्याचा निर्णय घेतला. दुचाकीवर श्वानाला बसवून ते दावडी येथे पोहचले श्वानाला आंघोळ घालत असताना त्यांना तलावातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. ते एका पाठोपाठ बुडाले. तलाव गाळाने भरला आहे. तलावाकाठी कपडे, श्वान दिसतोय पण तेथे कोणी नसल्याचे एका पादचाऱ्याला दिसले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. जवानांनी शोध घेऊन तलावातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. रणजित एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात, कीर्तिने बारावीमध्ये प्रवेश घेतला होता. या दुर्घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.