कचरा भरून ठेवलेली प्लास्टिकची पिशवी भावाच्या पाळीव कुत्र्याने फाडून अंगणात पुन्हा कचरा पसरवल्याने भावांनीच आपल्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंगल मधु कलाडीया यांच्या फिर्यादीवरून त्यांचेच बंधू दशरथ कलाडीया, महादेव कलाडीया आणि पुतण्या कृष्णा गिरीधर कलाडीया या तिघांवर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘वड्याचं तेल वांग्यावर’ अशी एक म्हण मराठीत प्रसिद्ध आहे आहे. याच म्हणीला साजेसा प्रसंग उल्हासनगरातील कॅम्प पाच परिसरात समोर आला आहे. कॅम्प पाच परिसरातील शिव कॉलनी चाळ क्रमांक एक येथे राहणारे मंगल मधु कलाडीया (५०) व्यवसायाने टेम्पो चालक आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी साफसफाई करून सगळा कचरा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून बाहेर ठेवला. त्यांच्याच पाळलेल्या कुत्र्याने ही पिशवी फाडून हा कचरा त्यांच्या शेजारच्या सख्ख्या भावांच्या अंगणात पसरवला. या कारणावरून फिर्यादी यांचे भाऊ दशरथ मधु कलाडीया (३५), महादेव मधु कलाडीया (४५) आणि त्यांचा पुतण्या कृष्णा गिरीधर कलाडीया (२२) या तिघांनी आपापसात संगनमत करून मंगल कलाडीया यांना ठोश्या बुक्क्याने मारहाण केली. तसेच महादेव यांच्या हातात असलेला बर्फ टोचण्याचा टोच्याने मंगल कलाडीया यांच्या पायावर वार करून दुखापत केली. याप्रकरणी मंगल मधुकर कलाडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात दशरथ कलाडीया, महादेव कलाडीया आणि कृष्णा गिरीधर कलाडीया या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.