लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कोलशेत येथे एका सिक्युरीटी सुपरवायझरचे शीर छाटून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात आता ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. प्रसाद कदम असे आरोपीचे नाव असून सुपरवायझरने शिवीगाळ केल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचे मानसिक संतुलनही सुस्थितीत नसल्याचे तपासात समोर आले आहे.

कोलशेत येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. सोमवारी पहाटे या इमारतीच्या गच्चीवर सफाई कर्मचारी गेले असता, सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ देबनाथ यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचे शीर धडावेगळे झाले होते. तसेच त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर ठिकठिकाणी शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. तसेच समाजमाध्यमावर त्यांच्या मृतदेहाचे चित्रीकरण प्रसारित झाले होते. त्यामुळे कोलशेत भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाच (वागळे इस्टेट) कडून सुरू होता.

आणखी वाचा-विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटविल्याने डोंबिवलीत तीव्र नाराजी

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यावेळी इमारतीतील सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हा सोमनाथ यांच्यासोबत उद्वाहकामध्ये जात असल्याचे आढळून आले होते. तर परतताना कदम एकटाच होता. त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली. सोमनाथ याने प्रसाद याला शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाले होते. सोमनाथ याने शिवीगाळ केल्याने त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबूली प्रसाद याने दिली आहे. प्रसाद याचे मानसिक संतुलन सुस्थितीत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रसाद याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.