नीलेश पानमंद

गृह खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली; आर्थिक मंदीनंतर आता कोंडीचा फटका

मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम उद्योगाचे महत्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या घोडबंदर तसेच शीळ-कल्याण मार्गावरील गृहप्रकल्पांना आर्थिक मंदीपाठोपाठ या मार्गावर दररोज होणाऱ्या अजस्र अशा वाहनकोंडीमुळे उतरती कळा लागली असून या भागात घर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या ५० टक्क्यांनी रोडावली आहे, असा दावा विकासकांमार्फत केला जाऊ लागला आहे.

‘नाइट फ्रँक इंडिया’ या नामांकित सर्वेक्षण कंपनीने मध्यंतरी जाहीर केलेल्या ‘इंडिया रिअल इस्टेट’ या अहवालात ठाणे शहरात सुमारे २० हजार घरे विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा करण्यात आला होता. यामागे विविध कारणे असली तरी ठाणे, घोडबंदरच्या वेशीवर दररोज होणाऱ्या कोंडीचा फटकाही बांधकाम क्षेत्राला बसत असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे.

ठाणे शहरापाठोपाठ घोडबंदर परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असून या संकुलातील घरांच्या किमती ५० लाखांपासून पुढे आहेत. नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागातील वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद हा एकमेव महामार्ग असून येथून गुजरातच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाच्या वाहनांची तर दुपार आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक येथून सुरू असते. त्यामुळे चोवीस तास हा मार्ग कोंडीत सापडलेला असतो. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि घोडबंदर भागात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठी मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मार्गरोधक बसविण्यात आले आहेत. त्यात महामार्गालगतच्या समांतर उपरस्त्यांवर विविध वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत.

यामुळे या ठिकाणी जीव मेटाकुटीस नेणारी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात बंदी घातलेल्या वेळेतही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे घोडबंदर भागाला वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी फिरायला जाणारे नागरिक घोडबंदरमार्गे प्रवास करीत असून यामुळे सुटीच्या दिवशीही या मार्गावर प्रचंड कोंडी होते. या कोंडीमुळे सुटीच्या दिवशी नवीन गृहप्रकल्पातील घरे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम घरांच्या विक्रीवर होऊ लागला आहे.

नियोजनापूर्वीच नव्या वसाहतींची भर

घोडबंदर पाठोपाठ शीळ-कल्याण मार्गालगत अनेक मोठय़ा बिल्डरांचे गृह प्रकल्प उभे राहत आहेत. लोढा बिल्डरच्या पलावा या मोठय़ा प्रकल्पातील रहिवाशांच्या वाहनांचा मोठा भार या मार्गावर पडत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण तसेच रस्ते विकास महामंडळानेही या ठिकाणी विविध प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यामुळे येथील वाढती लोकसंख्या वाहतूक नियोजनासाठी चिंतेचा विषय ठरत असताना सरकारने या मार्गावर पलावाच्या धर्तीवर १३३ एकरावर आणखी मोठय़ा विशेष नागरी वसाहतीस (टाऊनशिप) मंजुरी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सद्य:स्थितीत या मार्गावर ३० लाखांपासून पुढे घरांच्या किमती आहेत. वाहतूक कोंडीमुळे येथील प्रकल्पही मंदीच्या छायेत आहेत, असे काही विकासकांनी सांगितले.

घोडबंदर परिसरातील नवीन गृहप्रकल्पांमधील घरे खरेदी करण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी ग्राहक यायचे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या सुट्टीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून यामुळे घर खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी रोडावली आहे. त्याचा परिणाम घरांच्या विक्रीवरही झाला आहे. आधीच आर्थिक मंदीमुळे घरांची विक्री कमी झाली असतानाच त्यात आता या व्यवसायाला कोंडीचा फटका बसू लागला आहे. तसेच शीळफाटा भागाला ग्राहक फारशी पसंती देत नाहीत.

– जितेंद्र मेहता, उपाध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे

घोडबंदर भागातील घरे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाहतूक कोंडीमुळे कमी झाली आहे. मात्र, या ठिकाणी मेट्रो प्रकल्प तसेच विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच अवजड वाहतुकीसाठी गायमुख कोस्टल रोड, अलिबाग-विरार कॉरिडोर या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण केली पाहिजेत. ती लवकर झाली नाहीत आणि वाहतूक कोंडी राहिली तर नागरिकांचे घरे घेण्याचे मनोबल कमी होईल. त्यामुळे कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.

– सचिन मिराणी, सचिव, एमसीएचआय, ठाणे