builders cheated doctor couple of kalyan dombivli municipal corporation for 56 lakh zws 70 | Loksatta

कल्याण डोंबिवली पालिकेच्या डॉक्टर दाम्पत्याची ५६ लाखांची फसवणूक

डॉक्टर दाम्पत्याने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे

कल्याण डोंबिवली पालिकेच्या डॉक्टर दाम्पत्याची ५६ लाखांची फसवणूक
प्रतिनिधिक छायाचित्र

कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय विभागात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीची चार विकासकांनी गाळे विक्रीतून ५६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. पुरुषोत्तम टिके आणि डॉ. प्रज्ञा टिके अशी डॉक्टर दाम्पत्याची नावे आहेत. डॉ. पुरुषोत्तम हे पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत, तर डॉ. प्रज्ञा या वसंत व्हॅली येथील पालिका रुग्णालयाच्या प्रमुख आहेत.

हेही वाचा >>> पतीशी मैत्री केल्याने बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला मारहाण; कात्रीने कपडेही फाडले

मोहनलाल एस. पटेल, जतीन मोहनलाल पटेल, अंकित मोहनलाल पटेल (रा. सद्गुरू सॉलेटिअर, कासारवडवली, घोडबंदर रोड, बिकानेर हॉटेलच्या वर, ठाणे) आणि मनसुख वसानी अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या आठ महिन्याच्या काळात ही फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथील श्री मूर्ती सोसायटी मधील दोन व्यापारी गाळे संजय पटेल यांनी राजेशकुमार महोनहरथप्रसाद शर्मा यांना विक्री केले होते. या दोन्ही गाळ्यांची विक्री झाली आहे हे माहिती असुनही आरोपी चार जणांनी संगनमत करुन ते दोन्ही गाळे डॉ. पुरुषोत्तम आणि डॉ. प्रज्ञा टिके यांना एक कोटी ४५ लाख रुपयांना विक्री केले. या गाळ्यांचा नोंदणीकरण व्यवहार आरोपींनी करुन दिला. अशाप्रकारे डॉ. पुरुषोत्तम आणि डॉ. प्रज्ञा यांची आरोपींनी संगनमत करुन ५६ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. डॉक्टर दाम्पत्याने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. एम. वाघमारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 11:55 IST
Next Story
पतीशी मैत्री केल्याने बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला मारहाण; कात्रीने कपडेही फाडले