ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून शेती उत्पादनास चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला असतानाच, बुलढाण्याच्या एका शेतकऱ्याचे १३ हजार ९३० किलो वजनाचे २ लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचे टरबूज घेऊन ठाण्यातील एक भामटा पसार झाला आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील तक्रारदार ३४ वर्षीय शेतकरी हे मेहकर भागातील रहिवासी आहे. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांनी शेतामध्ये टरबूजची लागवड केली होेती. १६ मार्चला ते फेसबुक हे समाज माध्यम वापर असताना त्यांना एका ‘पेज’वर जाहीरात दिसली. त्यामुळे त्यांनी त्या जाहीरातीवरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने त्याचे नाव राहुल पाटील असे सांगितले. तसेच, त्याने टरबूजाचे वजन, मोजमाप, छायाचित्र त्याच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. शेतकऱ्याने याबाबतची माहिती त्याच्या व्हाॅट्सॲपवर पाठविल्यानंतर त्याने टरबूज चांगल्या दर्जाचे असल्याचे सांगितले. तसेच प्रतिकिलो १६ रुपये देण्याचे ठरल्यानंतर टरबूज पाठविताना प्रत्येक टरबूजाचे वजन किमान अडीच किलो असावे अशी अट देखील त्याने शेतकऱ्याला घातली.

शेतकरी ठाण्यात आणि फसवणूक…

१८ मार्चला शेतकरी त्याच्या टेम्पोमधून १३ हजार ९३० किलो टरबूज घेऊन बुलढाणा येथून ठाणे येथे येण्यास निघाला. १९ मार्चला पहाटे ५ वाजता शेतकरी ठाण्यातील वागळे इस्टेट भागात पोहचला. तेथील वजन काट्यावर मालाचे वजन करण्यात आले. टरबूज टेम्पोतून खाली उतरविल्यानंतर शेतकऱ्याने पैशांची मागणी केली. राहुल पाटील याने रोकड देऊ की ऑनलाईन पैसे पाठवू असे म्हटले असता, शेतकऱ्याने त्याच्या भावाच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर राहुल पाटील याने ऑनलाईन सेंटर येथे जाऊन पैसे पाठवितो, येथे थांबा असे म्हटले. त्याच्या भावाच्या खात्यावर पैसे आले नाही. त्यामुळे शेतकऱ्याने त्याला संपर्क साधला असता, त्याने २४ तासांत पैसे खात्यावर जमा होतील असे म्हटले. पैसे मिळाले नसल्याने शेतकरी चिंतेत होता. शेतकरी मुंबईतील त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहिला.

दुसरा दिवस उजाडल्यानंतरही त्याच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. शेतकऱ्याने राहुल पाटील याला संपर्क साधला असता, त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. त्याने वागळे इस्टेट परिसरात चौकशी केली असता, त्याला राहुल पाटील बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.