ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने कार चालक कारमधून तात्काळ बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे महामार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. या घटनेत कारच्या पुढील भागात आगीमुळे मोठे नुकसान झाले होते.
मुंबई नाशिक महामार्गाने हजारो वाहने मुंबईच्या दिशेने किंवा मुंबईहून ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक, समृद्धी महामार्गाच्या दिशेने वाहतुक करत असतात. नोकरदारांकडून या मार्गाचा सर्वाधिक वापर होत असतो. हा महामार्ग विविध शहरांना जोडतो. परंतु याच महामार्गावर एक बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला.
मुंबई नाशिक महामार्गावरून कार चालक हा मुंबईतील पवई येथून ठाण्यातील कोलशेतच्या दिशेने वाहतुक करत होते. त्यांची कार शनिवारी रात्री ११.५० मिनीटांच्या सुमरास तीन हात नाका परिसरात आली असता, कारच्या पुढील भागात अचानक आग लागण्यास सुरुवात झाली. कार चालक एकटेच असल्याने ते तात्काळ कारमधून बाहेर पडले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान बचाव वाहन आणि अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहचले. तसेच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी देखील पिकअप वाहनासह उपस्थित होते. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण कारचा पुढील भाग जवळपास जळून खाक झाला होता. पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
