scorecardresearch

ठाणे जिल्ह्यातील एसटी आगारातून ४२३ बसची सेवा सुरू ;२ हजार ५४० कर्मचारी सेवेत

मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता.

ठाणे : मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे या न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी कर्मचारी हळूहळू रुजू होत आहेत. त्यानुसार मागील काही दिवसांपासून ठाणे विभागातील २,५४० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
सद्यस्थितीला विभागातून ४२३ गाडय़ा धावत आहेत. त्यामुळे जिल्हा अंतर्गत तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा प्रवाशांच्या सोयीनुसार पूर्वपदावर येत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.
ठाणे विभागात ठाणे १, ठाणे २, भिवंडी, वाडा, कल्याण, विठ्ठलवाडी, शहापूर आणि मुरबाड असे आठ आगार आहेत. या आठ आगारात चालक, वाहक, प्रशासकीय, कार्यशाळा असे सर्व मिळून एकूण २,७५० च्या आसपास कर्मचारी आहेत. या आठ आगारातील विभागातून जिल्हा अंतर्गत तसेच लांब पल्ल्याच्या १५०० फेऱ्यांमधून दर दिवसाला ५३ लाख उत्पन्न मिळत असते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच महामंडळाला उत्पन्नाला देखील मुकावे लागले होते.
सुरुवातीला विभागातील एक हजार कर्मचारी रुजू झाले होते. मात्र, पूर्ण संख्येने कर्मचारी कामावर रुजू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू होण्याचा आदेश दिला. त्यानुसार ८ एप्रिल पासून विभागातील कर्मचाऱ्यांची पावले कामावर रुजू होण्यासाठी वळली असून आतापर्यंत एकूण २,५४० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे भिवंडी, वाडा, कल्याण, बोरीवली, पनवेल अशा जिल्हा अंतर्गत तसेच लांब पल्ल्याच्या अशा मिळून ४२३ गाडय़ा धावत आहेत. यामधून दिवसाला १४०० फेऱ्या होत असून यामधून विभागाला ४५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती ठाणे विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
उर्वरित २०० कर्मचारी लवकरच रुजू
ठाणे विभागात आतापर्यंत २,५४० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर, २०० कर्मचारी अद्यापही कामावर रुजू झाले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी विभाग नियंत्रकाकडे अपील केले असून लवकरच हे कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत, अशी माहिती ठाणे विभागाकडून दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bus service started st depot thane district employees service district urban rural areas amy

ताज्या बातम्या