फुलपाखरांच्या जगात : राज्य फुलपाखरू

फुलपाखरं सर्वसाधारणपणे एकसारखी दिसत असली तरी त्यांचे अनेक प्रकार आहेत.

फुलपाखरं सर्वसाधारणपणे एकसारखी दिसत असली तरी त्यांचे अनेक प्रकार आहेत.

फुलपाखरं सर्वसाधारणपणे एकसारखी दिसत असली तरी त्यांचे अनेक प्रकार आहेत. सवयीने नेमकं निरीक्षण केल्यास आपण फुला-फुलांवर बागडणाऱ्या फुलपाखरांना ओळखू शकतो. साधारणपणे सकाळी तसेच संध्याकाळी फुलपाखरं दिसतात. नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्याने ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून ब्ल्यू मॉरमॉन (Blue Mormon) या फुलपाखराचं नाव घोषित केलं आहे. याच राज्य फुलपाखराची आपण ओळख करून घेऊ या.
ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराचं शास्त्रीय नाव पोपिलिओ पॉलिम्नेस्टर (Popillio Polymnestor) असं आहे. कीटक वर्गातील हे फुलपाखरू पापिलिओनिडाय या जातीतील आणि पालिलिओनिनाय उपजातीतील आहे. मध्य भारत, सिक्कीम, पूर्व भारत इथे दिसणारं हे फुलपाखरू मुंबईपासून दक्षिणेकडे, दक्षिण भारतामध्ये अगदी सर्वत्र आढळतं. याचं राहण्याचं प्रमुख ठिकाण मात्र ‘पश्चिम घाट’ किंवा सह्य़ाद्री हेच आहे. पश्चिम घाट परिसरामध्ये पडणारा प्रचंड पाऊस, वर्षभर राहणारी दमट हवा, इथली सदाहरित जंगलं, सजीवांसाठी पोषक असंच हे वातावरण आहे. शिवाय इथला उन्हाळाही फारसा कडक नसतो म्हणजेच सम हवामान असतं. अर्थातच अनेक प्रकारचं सजीव आणि आपलं राज्य फुलपाखरू इथे मुक्तपणे संचार करत असतं.
महाराष्ट्रात मिळणारं हे सर्वात मोठं फुलपाखरू ‘स्वॉलोटेल’ कुळातील आहे. स्वॉलो अर्थात पाकोळी नावाच्या पक्ष्याप्रमाणे या फुलपाखरांच्या मागील पंखाच्या टोकाला असलेल्या शेपटीमुळे त्याला ‘स्वॉलोटेल’ असं म्हणतात. ब्ल्यू मॉरमॉनचे पंख काळ्या रंगाचे असतात आणि त्यावर फिकट आकाशी रंगाचे ठिपके असतात. ही रंगसंगती अगदी साधी पण अतिशय आकर्षक असते.
डोंगरमाथा, उतार आणि सपाटीचे प्रदेश अशा सर्व ठिकाणी फिरत राहणं या फुलपाखरांना फार आवडतं. किंबहुना ज्याला स्थानिक स्थलांतर (local migration) म्हणता येईल असा प्रवास ही फुलपाखरं सतत करत असतात. पावसाळ्यात जेव्हा डोंगरांमध्ये प्रचंड पाऊस असतो तेव्हा ही फुलपाखरं सपाटीवरचा प्रदेश निवडतात. म्हणून पावसाळा आणि त्यानंतर लगेचचा काळ यात ही फुलपाखरं आपल्या आसमंतात आपण पाहू शकतो. पावसाळ्यानंतर मात्र ब्ल्यू मॉरमॉन पुन्हा दाट झाडी आणि डोंगररांगांचा आसरा घेतात. ही फुलपाखरं अगदी झपाटय़ाने आणि खालीवर वळण घेत उडत असताना पाहणं अगदी छान असतं. असं वर-खाली वळणं घेत उडण्यामुळे ती आपल्या भक्षकालाही चकवू शकतात. ही फुलपाखरं बघायची असतील तर भरपूर फुलं असणाऱ्या भागांत फुलांमध्ये असलेला मध चाखताना त्यांना पाहता येईल. प्रत्येक प्रकारची फुलपाखरं ही विशिष्ट अशा झाडांवरच अंडी घालतात. लिंबू, संत्री, बेल अशा प्रकारच्या झाडांवर ही फुलपाखरं अंडी घालतात. अशी झाडं शहरातदेखील मुबलक प्रमाणात आढळत असल्याने ब्ल्यू मॉरमॉनचा संचार शहरी भागातही असतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Butterfly world