ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात आजपासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यास सुरुवात होणार आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत राबविल्या जाणाऱ्या या अभियानात १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणी पालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरेाग्य केंद्रांवरती करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अभियानांतर्गत १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची आरोग्य तपासणी , प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानासाठी राजीव गांधी रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच ठाण्यातील स्त्रीरोग रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत. तसेच महिलांना व बालकांना फोलीक ॲसीड, कॅल्शीअम, आयर्न अशी आवश्यकतेनूसार औषधेही देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत समुपदेशनही केले जाणार आहेत. त्यात, गर्भधारणापूर्व काळजी आणि मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती, पोषण या विषयांचा समावेश आहे.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

या अभियानात, सोनोग्राफी शिबीरही घेण्यात येणार आहे. यामध्ये छातीचे एक्सरे, आवश्यकतेनूसार मॅमोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच महिला व मातांचे हिमोग्लोबीन, रक्त-लघवी यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. माता-बालकांचे लसीकरणही करण्यात येणार आहे. ३० वर्षावरील स्त्रीयांचे कर्करोग, रक्तदाब, मधुमेह स्क्रींनिंग करण्यात येणार आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ’ या अभियानात सर्व महिलांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : गेहलोत-पायलट संघर्षाचा नवा अंक : राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार?

टेंभी नाका येथे आरोग्य शिबीर

या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. टेंभी नाका नवरात्रोत्सवात हजारो महिला देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा, यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. टेंभी नाका येथील शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याशिवाय, महिलांची बीएमआय, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, मॅमोग्राफी, एक्स रे, ईसीजी यासारख्या तपासण्या विनामुल्य केल्या जाणार आहेत. तसेच, रुग्णाच्या आवश्यकतेनुसार महापालिकेच्या रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campaign mother safe home safe has started thane city today municipal commissioner dr vipin sharma tmb 01
First published on: 26-09-2022 at 11:14 IST