कल्याण- पावसाळ्यात पादचाऱ्यांना रस्ते, पदपथावरून चालताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कल्याणमध्ये प्रभाग हद्दीतील पदपथांवरील टपऱ्या, निवारे जमीनदोस्त करण्याची कारवाई साहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

अशा प्रकारची कारवाई डोंबिवलीतील फ, ग, ह आणि ई प्रभागातील साहाय्यक आयुक्त कधी सुरू करणार, असे प्रश्न रहिवासी, पादचारी उपस्थित करत आहेत. डोंबिवलीतील साहाय्यक आयुक्त विकासकांच्या आदेशावरून फक्त अतिधोकादायक इमारतीच तोडत राहणार का. बेकायदा इमारती तोडण्याऐवजी अशा इमारतींच्या सर्व्हेक्षणात अधिकारी वेळ घालवित आहेत. त्यांनीही डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील पदपथ, मुख्य रस्त्यांना अडसर ठरणारी पदपथांवरील बेकायदा टपऱ्या, निवारे जमीनदोस्त करावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पावसाळ्या पूर्वीच्या उपाय योजनांचा भाग म्हणून पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्याचे आदेश प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे कल्याणमधील साहाय्यक आयुक्तांनी पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. डोंबिवलीतील ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय जाधव, ई प्रभागाचे भारत पवार यांनाही आयुक्तांनी पदपथ, रस्त्यांवरील अतिक्रमणे करण्यासाठी आदेशित करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील क प्रभाग हद्दीत साहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांनी संदीप हाॅटेल ते छत्री बंगला भागातील रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी ११ बांधकामे जमीनदोस्त केली. कल्याण बस आगारा समोरील टपऱ्या, हातगाड्या तोडून टाकल्या. कल्याण पूर्वेतील जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कचोरे भागातील स्मशानभूमीच्या आरक्षित भूखंडावर उभारलेली बेकायदा बांधकामे तोडून टाकली. याच भागात उभारण्यात आलेल्या चाळी जमीनदोस्त केल्या. ९० फुटी रस्त्यावर गावदेवी मंदिर ते लक्ष्मी कृपा सोसायटी परिसरातील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालत येत नाही. याविषयी अनेक तक्रारी रहिवाशांनी फ प्रभागाकडे केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्वेतील ड प्रभागात साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी चक्की नाका, कैलास नगर, शंकर पावशे रस्ता भागातील दुकानदारांनी पदपथावर बांधलेले निवारे, पदपथावरील टपऱ्या, हातगाड्या तोडून टाकल्या.जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई केली जात आहे.