ठाकुर्लीतील डोंबिवली-कल्याण रेल्वे समांतर ९० फुटी रस्त्यावर शनिवारी सकाळी अचानक एका कारला आग लागली. कारला आग लागताच परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा मारा केला. आग आटोक्यात आली नाही. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होताच त्यांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. आगीत कारचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नाही.
मिळालेली माहिती अशी, अभिजित खाडे यांनी त्यांची कार ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील चामुंडा उद्यानाजवळ उभी केली होती. खाडे सकाळी जिममधून आल्यावर कारमध्ये बसून रात्रभर कार बाहेर असल्याने कारला काही झाली नाही हे पाहण्यासाठी कारमध्ये बसले होते. तेवढ्यात कार समोरील बोनेटमध्ये जोराने आवाज होऊन कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. तात्काळ कारला आग लागली. खाडे यांनी तातडीने कारमधून बाहेर उडी मारली. तेथून पळ काढला.




कार आगीत जळून खाक होईल या भीतीने परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न अपुरे पडले. नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती देताच अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. कारचे आगीत नुकसान झाले. या आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक दीपक भोसले आणि त्यांचे सहकारी आग विझविण्यासाठी, जवानांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील होते.