गोवेली परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रचा उपक्रम
ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे आणि त्याआधारे स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा या हेतूने बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. कल्याण येथील गोवेली परिसरात हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी बँक प्रशासनाने सुसज्ज इमारत उभारण्याकरिता हालचाली सुरू केल्या आहेत. या केंद्रामध्ये तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय, प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व जेवणाची विनामूल्य सोय तसेच वाहतूक खर्च देण्यात येणार आहे, अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे ठाणे क्षेत्रीय व्यवस्थापक आर. हरीकुमार यांनी दिली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ठाणे विभागाच्या वतीने बुधवारी विविध कार्यक्रम तसेच पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत १९ ग्राहकांना कर्जवाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान ठाणे क्षेत्रीय व्यवस्थापक आर. हरीकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील सुरक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चालविण्याचा उपक्रम ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून राबविण्याच येतो. मात्र, तिथे पुरेशा जागा तसेच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात नवे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. कल्याण येथील गोवेली भागात जिल्हा परिषदेची जागा असून ती बँकेने भाडे तत्त्वावर घेतली आहे.
या जागेवर व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी इमारत उभारण्यात येणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे. तसेच येत्या वर्षभरात सुसज्ज इमारत उभारून तिथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहितीही आर. हरीकुमार यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील तरुणांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये प्रवेश घेण्याकरिता किमान आठवी पास शिक्षण बंधनकारक असणार आहे. या उपक्रमांमध्ये फॅशन डिझायिनग, वाहन दुरुस्ती आणि इतर व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याचा कालावधी सुमारे १० ते ४० दिवसांचा असणार आहे. एका वर्गात सुमारे २० ते २५ जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षभरात सुमारे ७५० तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार असून या कौशल्याच्या आधारे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तसेच ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
अकोला : प्रशिक्षण केंद्रातील ६० महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, दूषित पाण्यासह उन्हाचा फटका
allahabad high court ani photo
“यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अ‍ॅक्ट घटनाबाह्य”, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; मदरसेही शिक्षण विभागाच्या अखत्यारीत!