डोंबिवलीतील कोपर रेल्वे उड्डाण पुला जवळ संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू असताना बुधवारी संध्याकाळी दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत विष्णुनगर पोलिसांनी एका मजुराच्या तक्रारीवरुन या कामाच्या ठेकेदारा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शिवा एन्टरप्रायझेस, मुंबई असे ठेकेदार कंपनीचे नाव आहे. या ठेकेदार कंपनीच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे : लाचेप्रकरणी पोलीस कर्मचारी ताब्यात

मध्य रेल्वेने कोपर रेल्वे ते डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू केले आहे. या नवीन भिंतीच्या बाजुला बारा फूट उंचीची एक जुनी संरक्षक भिंत आहे. नवीन भिंत उभारणीचे काम सुरू असताना अचानक जुनी भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली सात मजूर अडकले. नागरिकांनी पाच जणांना ओढून बाहेर काढले. यामधील दोन मल्लेश चव्हाण, बंडू कुवासे हे कामगार जागीच ठार झाले. माणिक पवार, युवराज गुत्तलवार, विनायक चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. माणिक, विनायक यांच्यावर शीवच्या लो. टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत आहे.हे काम करत असताना ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतली नाही. जुनी भिंत कधीही कोसळू शकते याची माहिती असुनही कामगारांना त्या धोकादायक परिस्थितीत काम करण्यास लावले. त्यामुळे विष्णुनगर पोलिसांनी ठेकेदार आणि या कामाशी संबंधितांविरुध्द निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against contractor in death of laborer near kopar railway bridge amy
First published on: 22-09-2022 at 17:50 IST