ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये घराच्या आगीत महिला गंभीर जखमी

ठाकरे गटाच्या वतीने सध्या शिवगर्जना मेळावे सुरू आहेत. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. रेपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना समाजमाध्यमांवर राजुल पटेल यांच्या भाषणाची एक चित्रफीत मिळाली होती. या भाषणामध्ये राजुल पटेल या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले असे रेपाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी रेपाळे यांनी राजुल पटेल यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.