scorecardresearch

डोंबिवलीत फिल्मीस्टाईल ‘खंडणी’नाट्य! टोळक्यानं पिस्तुलाचा धाक दाखवून मागितली ५० लाखांची खंडणी!

आरोपींनी दोनदा पाठलाग करून पिस्तुलाच्या धाकाने खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.

pistol
प्रातिनिधिक छायाचित्र

डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल जवळील बंदिश हॉटेलजवळ शुक्रवारी रात्री चार तरूणांनी ठाकुर्लीतील एक तरूण आणि त्याच्या दोन साथीदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून ५० लाख रूपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. पहिल्यांदा शिताफीनं हे तिघे निसटल्यानंतर देखील त्यांचा शेलार चौकापर्यंत पाठलाग करून तिथे देखील पिस्तुल आणि दंडुक्याच्या सहात्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न या चौघांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडला. आधी घारडा सर्कलजवळ चार तरुणांच्या टोळक्याने आधी या तिघांना रोखून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली. पण तिथून शिताफीने निसटत हे तिघे आपल्या मोटारीत बसले. त्यांनी आपलं वाहन डोंबिवलीतील घरडा सर्कलकडून शेलार चौकाच्या दिशेने आणले. त्यावेळी चारही तरूणांनी फॉर्च्युन वाहनातून पाठलाग करून त्यांना शेलार चौकात अडविले. तेथे त्यांना शिवीगाळ केली. स्वत:च्या वाहनातील काठ्या हवेत फिरवून “मध्ये कोणी पडले तर बघून घेऊ” असे पादचाऱ्यांना धमकावत दहशत निर्माण केली. तक्रारदाराच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकुर्लीतील त्रिलोक हाईट्समध्ये राहणारे मेहुल जेठवा (२९) हे कल्पेश आणि सरस्वती या दोन साथीदारांसह घारडा सर्कलजवळील माठ विक्रेत्यांकडे शुक्रवारी रात्री माठ खरेदीसाठी आले होते. माठ खरेदी करत असताना तेथे दिनेश कृष्णा पाटील, राजेंद्र माने, कैलास गायकवाड, दीपक चव्हाण (रा. डोंबिवली) हे फॉर्च्युन वाहनातून आले. दिनेशने दीपक चव्हाणकडील पिस्तूल स्वत:कडे घेत, मेहूल जेठवाला धमकावत “आताच्या आता ५० लाख रूपयांची खंडणी दे. नाहीतर तुला येथेच ठार मारतो”, अशी धमकी दिली.

आरोपींची नजर चुकवून तिघेजण शिताफीने गाडीत बसून निघाले असता त्यांचा पाठलाग करून पुन्हा त्यांना शेलार चौकात अडवण्यात आलं. तिथे देखील आरोपींची गुंडागर्दी सुरू असताना जेठवा आणि त्यांच्या साथीदारांनी पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यासंदर्भात दिनेश पाटील व त्याच्या तीन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case filed in dombivali against four accused extorting money pistol pmw