ठाणे : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला होता. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे. बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. शनिवारी रात्री भगवा सप्ताह निमित्ताने उद्धव ठाकरे हे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे येत होते. त्यांचा ताफा नितीन कंपनी येथे आला असता, रस्त्यामधील दुभाजकाजवळ पांढऱ्या पिशव्यांमध्ये सात ते आठजण नारळ घेऊन आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याच्या दिशेने तुफान नारळफेक केली. या घटनेत ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्विकारली आहे. हेही वाचा.Anita Birje : आनंद दिघेंच्या सहकारी अनिता बिर्जे शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का या हल्ल्याच्या काही मिनीटानंतरच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी समाजमाध्यमावर एक चित्रीकरण प्रसारित केले. ‘तुम्ही आमच्या राज साहेबांच्या ताफ्यावर सुपारी फेकून मारल्या. त्यामुळे आम्ही उत्तर दिले. तुम्ही सुपारी फेकली तर आम्ही नारळ फेकू’ असे अविनाश जाधव यांनी चित्रीकरणात म्हटले आहे. यापुढे राज ठाकरे यांच्याविरोधात काही बोलल्यास घरात घुसून मारू असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा.Sanjay Raut : “मलाही एक चित्रपट काढायचाय”, ठाण्यातून संजय राऊतांची घोषणा? नावही जाहीर केलं नारळ फेकल्याच्या गंभीर प्रकारानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वागळे इस्टेट येथील विभाग प्रमुख प्रितेश राणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, अविनाश जाधव, प्रितेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलु, मनोज चव्हाण, यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतन येथे उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घातला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ४४ जणांविरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे