ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून ते कैद्यांच्या बॅरेकपर्यंत तब्बल ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून यामुळे संपूर्ण कारागृह परिसर आता कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली राहणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे कारागृहातील कैद्यांपर्यंत होणारी अमली पदार्थ तसेच मोबाइल वाहतूक अशा गैरप्रकारांना आळा बसणार आहे. तसेच कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या हालचालीवरही प्रशासनाची करडी नजर ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय, कारागृहाचा कारभार पारदर्शक होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर कैद्यांकडून हल्ले करण्याचे प्रकार यापूर्वी घडले असून या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच काही वर्षांपूर्वी कैद्यांना अमली पदार्थ पुरवूत असताना एका कर्मचाऱ्याला कारागृह प्रशासनाने पकडले होते. तसेच कारागृह प्रशासनाच्या कारभाराविरोधात कैद्यांच्या नातेवाईकांकडून तक्रारी केल्या जातात. या पाश्र्वभूमीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एन. बी. वायचळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान, कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गृह विभागाकडे पाठपुरावा करून ठाणे कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३७ लाखांचा निधी मिळविला. या निधी अंतर्गत ५२ सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करून ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात बसविण्यात आले आहेत. तसेच कारागृहात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कारागृहातील सीसीटीव्ही यंत्रणेचे आणि नियंत्रण कक्षाचे उद्घाटन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून ते कैद्यांच्या बॅरेकपर्यंत तब्बल ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून कारागृहामध्येच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमार्फत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा तसेच कारागृहाचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एन. बी. वायचळ यांनी दिली.