संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा वन विभागाचा प्रस्ताव

ठाणे शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊर जंगलात अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, वन्यजीव-पक्ष्यांची शिकार होण्याच्या घटना वाढू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर या निसर्गसंपदेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच पुरवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. जंगलातील चार ते पाच मोक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव येऊर विभागीय कार्यालयाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुख्यालयाकडे पाठवला आहे. त्यामध्ये येऊरच्या टेकडीवरील बीएसपी गेट, वायुदलाचा परिसर तसेच मानपाडा भागामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी आवश्यक मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या भागात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास जंगलाची अधिक काटेकोरपणे निगराणी करणे शक्य होईल, असा दावा विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी केला.

वन्यप्राणी, जैवविविधता आणि दुर्मीळ वृक्षांची संपदा असलेल्या येऊरच्या जंगलामध्ये शहरातील अनेक मंडळींकडून वारंवार अतिक्रमणे करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ लागला आहे. हे टाळण्यासाठी जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. सध्या येऊरच्या मुख्य प्रवेशद्वारावर केवळ दोन सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांची नोंदणी क्षमता केवळ १२ जीबी इतकी मर्यादित होती. प्रत्यक्षात या परिसरात २०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत, अशी मागणी पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर येऊरच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये बीएसपी गेट, एअरफोर्स परिसर आणि मानपाडा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची परवानगी मिळावी तसेच त्यासाठी आवश्यक खर्चाचीही माहिती मुख्य वन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. विभागीय वन अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले.

‘चांगल्या दर्जाचे कॅमेरे’

येऊरमध्ये नव्याने बसवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांची गुणवत्ता ही अधिक चांगली असणार आहे. लांब पल्ल्यावरील आणि रात्रीच्या वेळी केले जाणारे चित्रीकरणही अधिक सुस्पष्ट होऊ शकणार आहे. याशिवाय सध्या उपलब्ध कॅमेऱ्यांची साठवणूक क्षमताही वाढवण्यात आली असल्याची माहिती संजय वाघमोडे यांनी दिली.

‘आणखी कॅमेरे आवश्यक’

येऊरमध्ये काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्थांनी मात्र येऊरच्या परिसरातील २० ते २५ ठिकाणी असे कॅमेरे बसवले तर या परिसरावर पुरेसे लक्ष राहू शकेल, असे मत व्यक्त केले आहे. मुख्य रस्त्यालगतच्या अनेक बंगल्यांमध्ये रात्रीच्या वेळी पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे तेथे वनकायद्यांचा भंग होत असल्याने या भागातही कॅमेरे बसवणे आवश्यक असल्याचे मत येऊर इन्व्हायरमेंटल सोसायटीचे सदस्य मयूरेश हेंद्रे याने व्यक्त केले आहे.