ठाणे : ११ एप्रिलला प्रदर्शित होणारा महात्मा फुले हा सिनेमा आता २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. निर्माते – दिग्दर्शक दबावाला बळी पडले. तो त्यांचा चांगुलपणा आहे. नेहमीप्रमाणे जातीयवाद्यांचा भरणा असलेल्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार येथील जातव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमाद्वारे केली आहे.
महात्मा फुले या सिनेमाच्या निर्मात्याशी आताच माझे बोलणे झाले. येत्या २५ तारखेला हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. ११ तारखेला प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. निर्माते – दिग्दर्शक दबावाला बळी पडले. तो त्यांचा चांगुलपणा आहे. नेहमीप्रमाणे जातीयवाद्यांचा भरणा असलेल्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार येथील जातव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका त्यांनी केली. लक्षात ठेवा, सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असेही ते म्हणाले आहेत.
या सिनेमामुळे वाद निर्माण झाला. या सिनेमाला विरोध झाला. निदान लोकांच्या घराघरात तरी हा जातीव्यवस्था, कर्मकांड आणि ब्राम्हण्यवादाची चर्चा सुरू झाली. बहुजनांनो तुमच्यावर झालेला अन्याय हा इतिहास आहे अन् हाच इतिहास पुढे तुम्हाला मार्गदर्शन करीत राहिल. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्हाला शुद्धीत आणण्यासाठी जे इंजेक्शन, जे सलाईन द्यावे लागते, ते काढून घेण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
तुमच्या पूर्वजांना जनावरापेक्षा वाईट वागणूक दिली जात होती, हे विसरून तुम्ही ज्या परिस्थितीत जगत आहात, त्याला येथील मनुवाद, चातुर्वर्ण्य व्यवस्था , जातव्यवस्था कारणीभूत आहे, हे विसरून जाऊ नका. ज्या दिवशी स्वतःचा काळा इतिहास विसराल त्या दिवशी सगळंच संपलेले असेल. पुन्हा एकदा जातीभेदाच्या अंधारात लोटले जाल.
महात्मा जोतिराव फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही दिलंय ते सांभाळून ठेवूया… निदान एवढी तरी जबाबदारी पार पाडू या, असेही त्यांनी म्हटले आहे. महात्मा फुले या सिनेमाचे स्वागत करण्यासाठी तयार रहा. २५ तारखेला सिनेमा प्रदर्शित होतोय. हा सिनेमा कुणा एका जातीच्या विरोधात नाही तर तो सिनेमा तत्कालीन जुलमी समाजव्यवस्थेला जी व्यवस्था आजही काम करतेय, त्या व्यवस्थेला उघडं करणारा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांचे कार्य मानवजातीला न्याय देणारे
ज्ञान आणि बुद्धीमत्तेवर विशिष्ट एकाच समाजाची पकड असावी, ही हजारो वर्षांची तथाकथीत परंपरा सर्वात आधी मोडीत काढणारे जे कोणी असतील त्यामध्ये सर्वात पहिले नाव महात्मा फुले यांचेच आहे. जातीव्यवस्था, भेदभाव आणि स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक या विरोधात महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनी केलेले कार्य अजरामर आहे. त्यांचे हे कार्य कोणा एका जातीसाठी नव्हे तर सबंध मानवजातीला न्याय देणारे होते.
सत्य का नाकारताय
भारतीय इतिहासात चातुर्वर्ण्य, कर्मकांड आणि ब्राम्हण्यवाद हे सत्य नाकारणे म्हणजे मुर्खपणा आहे. ज्यांना ज्यांना चातुर्वर्ण्याचे चटके बसले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजदेखील आहेत. या कर्मकांडामुळेच महाराजांना, ‘तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही’, असे उन्मादात्मक आदेश देणारे कोण होते, हे पडताळून पाहण्याची आता गरज आहे. संभाजी महाराजांची हत्या करण्याचा कोणाचा कट होता? याची चर्चा झालीच पाहिजे. बरं झालं, महात्मा फुले या सिनेमाला काही लोकांनी विरोध केला. त्यामुळे काही सत्य पुन्हा समाजासमोर येईल अन् झोपलेल्या बहुजनांना किमान हलवता तरी येईल, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.