ठाणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशासह राज्यात जनगणनेला सुरुवात झाली असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात स्व-गणना प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही नोंदणी कशी करावी, यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरबसल्या ‘स्व-गणना’ नोंदणी कशी करावी, याविषयी संपूर्ण प्रक्रियेविषयी जाणून घेऊया.

केंद्र सरकारच्या निर्देशा नुसार महाराष्ट्र जनगणना संचालनालयांच्या वतीने जनगणना करण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्व-गणना प्रक्रियेच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. स्व-गणना प्रक्रिया १ ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. यानंतर १६ ते २४ जून २०२६ दरम्यान प्रगणकांकडून प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. जनगणना ही देशाच्या आर्थिक, सामाजिक व पायाभूत विकासाच्या धोरणांसाठी महत्त्वाची आधारभूत प्रक्रिया आहे.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होऊन अचूक माहिती देणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळेत नोंदणी पूर्ण करावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी पोस्टरद्वारे १० स्टेप मध्ये नोंदणी प्रक्रिया कशी पूर्ण करावी याची माहिती देण्यात आली आहे.

नोंदणी कशी करावी?

स्व-गणना प्रक्रियेसाठी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घरबसल्या नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रथम पोर्टलवर लॉगिन करून कुटुंब प्रमुखाची नोंदणी करावी लागते, त्यानंतर मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP द्वारे पडताळणी केली जाते. पुढील टप्प्यात जिल्हा, शहर/गाव व पिन कोडसह स्थानाची माहिती भरून नकाशावर घराचे अचूक स्थान निश्चित करावे लागते. त्यानंतर सविस्तर प्रश्नावली भरून घराची स्थिती, कुटुंबातील सदस्य, उपलब्ध सुविधा व इतर माहिती नोंदवावी लागते. पुढे भरलेली माहिती पूर्वावलोकन करून तपासावी, आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी आणि त्यानंतर अंतिम सादर करावे. अंतिम सादरीनंतर प्रगणक घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करू शकतात. तसेच, दिलेली माहिती बरोबर असल्यास ती स्वीकारली जाईल, अन्यथा आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.