ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान महिला आता सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम करताना दिसतील. कारण, येथील महिला कारागृहात नुकतेच ओपन जीम सुरु करण्यात आले आहे. या ओपन जीममध्ये एकूण १२ उपकरणे असून महिला बंदीवानांना स्ट्रेचिंग, कार्डिओ करता येणार आहे. यामुळे महिला बंदीवानांचे आरोग्य सुदृढ राहणार असून त्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहणार आहे.
ठाणे येथे सेंट्रल जेल आहे. यामध्ये अनेक बंदीवान महिला आहेत. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी कारागृहात जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिला बंद्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ओपन जीम सुरु करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार, कारागृह प्रशासनाकडून महिला बंद्यांना ओपन जीमसाठी उपकरणे बसवून देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर विभागाने महिला बंद्यांकरिता ओपन जीमची उपकरणे बसविली आहेत.
ओपन जीमचे उद्घाटन नुकतेच जिल्हा न्यायाधीश भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कारागृह अधीक्षक राणी भोसले, उप अधीक्षक डी.टी. डाबेराव, व्ही.पी. कापडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी के.पी. भवर उपस्थित होते. महिला बंदींचे शारिरिक आणि मानसिक आरोग्य कसे चांगले राहू शकते, याबाबत न्यायधीश भोसले यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी महिला बंद्याशी संवाद साधला.