Mumbra Thane Train Accident : ठाण्याजवळ दिवा व मुंब्रा या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ९.२० च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान हा अपघात झाला. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी हे डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) उभे होते. त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासून काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. तसेच, तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर कळव्यातील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
कसारा-सीएसएमटी लोकलच्या दरवाजात उभे प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलच्या बाहेरच्या भागाला घासले गेले. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रेल्वेमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी आता मध्य रेल्वेने तीन निर्णय घेतले आहेत.
या अपघातानंतर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “दोन लोकल एकमेकांच्या बाजूने जात होत्या. त्यावेळी कसारा-सीएसएमटी लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासून खाली पडले.अनेकांच्या पाठीवर बॅगा होत्या, ज्या दुसऱ्या लोकलवर आदळल्या त्यामुळे ते खाली पडले”.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तीन निर्णय घेतले आहेत
स्वप्नील नीला म्हणाले, “या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत. ज्या नवीन गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहेत त्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टिम (या लोकल गाड्यांचे दरवाजे आपोआप बंद होतील) असेल. २३८ नव्या एसी लोकल आपल्याला मिळणार असून या लोकल डोअर क्लोज फिटमेंटसह येणार आहेत. तसेच आपण आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्या लोकल गाड्या सध्या मध्य रेल्वेवर धावत आहेत. त्या लोकल्समध्ये रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे आपोआप बंद होतील अशी सिस्टिम बसवण्याचा प्रयत्न करत आहोत”.