कल्याण – कल्याण ते आसनगाव रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे मार्गाच्या दुतर्फा नागरी वस्ती निर्माण झाली आहे. नवीन गृहसंकुले या भागात उभी राहत आहेत. भविष्यातील या वाढत्या वस्तीचा विचार करून मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गुरवली रेल्वे स्थानक उभारण्यात यावे ही या भागातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी आहे.
या मागणीसाठी गुरवली परिसरातील नागरिक आणि ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख मागील साठ वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. पण, आता रेल्वे प्रशासनाने गुरवली रेल्वे स्थानक उभारणे रेल्वे परिचलनाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे पत्र देशमुख यांना पाठविल्याने रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
कल्याण ते आंबिवली हा शहरी पट्टा, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव या ग्रामीण पट्ट्यात रेल्वे मार्गाच्या दुतर्फा नागरी वस्ती वाढत आहे. मुंबई परिसरात नोकरी व्यवसायासाठी जाण्यासाठी रेल्वेने एक ते दोन तास लागत असल्याने शहापूर, मुरबाड परिसरातील नोकरदार वर्ग कुटुंबीयांसह टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव परिसरात राहण्यास आला आहे.
टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव भागात रेल्वे मार्गात वस्ती वाढत आहे. टिटवाळा ते खडवली दरम्यानचे अंतर मोठे आहे. या भागात अनेक गावे आहेत. टिटवाळा ते खडवली दरम्यानच्या परिसरातील नागरिकांना लोकल प्रवासासाठी टिटवाळा किंवा खडवली रेल्वे स्थानक येथे बस, खासगी वाहन, रिक्षेने यावे लागते. अनेक वर्ष या भागातील नागरिक हा प्रवास करतात. पावसाळ्यात या प्रवासामुळे नागरिकांचे विशेषता महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात.
त्यामुळे टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानका दरम्यान गुरवली रेल्वे स्थानकाची उभारणी करावी, अशी मागणी या भागातील नागरिक मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागील साठ ते सत्तर वर्षापासून करत होते. रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार देशमुख यांनी गुरवली रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वेच्या मुंबई, दिल्लीतील वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेल्याच महिन्यात त्यांनी गुरवली रेल्वे स्थानकाची विनाविलंब उभारणी करावी, असा पत्रव्यवहार केला होता.
गुरवली रेल्वे स्थानक भविष्यात होईल असा विचार करून अनेक विकासकांनी टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गृहसंकुले उभारली आहेत. गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांना पत्र पाठवून गुरवली रेल्वे स्थानक उभारून तेथे लोकलना थांबा दिला तर लोकलचा परिचलनाचा वेळ वाढेल आणि रेल्वे वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही वाढीव लोकल त्यामुळे रद्द होऊ शकतात. त्याचा त्रास पुन्हा रेल्वे प्रवाशांना होऊ शकतो. तांत्रिक दृष्ट्या गुरवली येथे रेल्वे स्थानक होऊ शकत नाही, असे रेल्वे प्रशासनाने देशमुख यांना कळविले आहे.
भविष्यकालीन प्रवाशांचा वाढत्या गर्दीचा विचार करून गुरवली रेल्वे स्थानक ही काळाची गरज होती. अनेक वर्ष नागरिक या रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षेत होते. पण रेल्वेने या स्थानकाला नकार देऊन प्रवाशांचा हिरमोड केला आहे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.
