ठाणे स्थानकात गुरुवारी सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तब्बल अर्धा तास रेल्वे सेवा खंडित झाली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल झाले.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन येथे ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठय़ामध्ये बिघाड झाल्याने पॉवर ब्लॉक घेण्यात आला. यामुळे धीम्या मार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ा पूर्णपणे ठप्प झाल्या. मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान रेल्वेच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  नक्की काय बिघाड झाला आहे, तो ठीक होण्यास किती कालावधी लागेल याविषयी सूचना देण्यात येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
लोकल बंद झाल्याने ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळली. कळवा ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान बंद पडलेल्या लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून ठाणे स्थानक गाठणे पसंत केले. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने ती जलद मार्गावर फिरवण्यात आली होती. यामुळे जलद गाडी पकडण्यासाठी ठाणे स्थानकात प्रवाशांची धावपळ उडाली. धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र ती अत्यंत धीम्या गतीने असल्याने प्रवाशांना गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी तब्बल एक तासाचा उशीर झाला होता.