कळवा फाटक सुरूच राहिल्याने परिणाम

मुंबई : वाहनांसाठी कळवा येथील रेल्वे फाटक वीस मिनिटे सुरूच राहिल्याने मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रकाचा सायंकाळी बोजवाराच उडाला. रात्री ७.३० वाजता घडलेल्या या घटनेनंतर लोकल रात्री १० पर्यंत उशिरानेच धावत होत्या.

बुधवारी सांयकाळी ७.३० वाजता कळवा स्थानकाजवळील रेल्वे फाटका सुरूच राहिले. येथून पूर्व-पश्चिम जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे फाटक काही वेळ सुरूच ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्याचा फटका लोकल वेळापत्रकाला बसला. फाटक सुरूच राहिल्याने धीम्या लोकल ठाणे ते कळवा आणि कळवा ते मुंब्रा, दरम्यान उभ्याच राहात होत्या. फाटक पुर्ववत होण्यासाठी २० मिनिटे लागली आणि त्यानंतर लोकल हळूहळू पुढे सरकू लागल्या. परिणामी वेळापत्रक कोलमडले. सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल उशिराने जात असल्याने तेथून पुन्हा कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ांवरही परिणाम होत होता.

लोकल उशिराने धावत असल्याची उद्घोषणा काही स्थानकात केली जात होती. मात्र त्याचे कारण प्रवाशांना सांगितले जात नव्हते. काही जलद लोकल गाडय़ाही धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. कळवातील रेल्वे फाटक सुरू राहिल्याच्या घटनेची चौकशी केली जाणार असून त्याचा अहवालही मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.