डोंबिवली: मध्य रेल्वेच्या डोंबिवली, कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकातील सरकते जिने दिवसाआड तांत्रिक कारणामुळे बंद असतात. हे जिने सकाळी, संध्याकाळी रेल्वे स्थानकात प्रवाशांची सर्वाधिक धावपळ, वर्दळ असते त्या कालावधीत बंंद असतात. फलाटावरील गर्दी झटपट कमी व्हावी, प्रवाशांना झटपट फलाटावर उतरता, चढता यावे या उद्देशातून या सरकत्या जिन्यांची रचना रेल्वेने फलाटांवर केली आहे. पण मागील काही महिन्यांपासून हे सरकते जिने दिवसाआड बंद राहत असल्याने प्रवासी संतप्त आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीन आणि चारवर चढ, उतरण्यासाठी, पाचवर उतरण्यासाठी जिने आहेत. फलाट क्रमांक पाचवर मुंबई दिशेने फक्त प्रवाशांना उतरण्यासाठी जिन्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना पाय, हदयाचा त्रास आहे. ते प्रवासी फलाटावर उतरल्यानंतर कल्याण दिशेने येऊन जिने असलेल्या पायऱ्यांनी स्कायवाॅकवर जातात. डोंबिवली पूर्व डाॅ. राॅथ रस्त्यावर चढ, उतार करण्यासाठी सरकते जिने आहेत. आता हे जिने राॅथ रस्त्यावर पाणी तुंबले की बंद पडण्यास सुरूवात होईल. मागील आठ महिन्याच्या काळात हे जिने आठवड्यातून एक ते दोन वेळ बंदच असायचे, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
फलाट क्रमांक तीन आणि चारवर चढ, उतार करणारा सरकता जिना आहे. हा जिना अनेक वेळा बंद असतो. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि फलाट क्रमांक जलद लोकने फलाटावर उतरलेल्या प्रवाशांची एकच झुंबड सरकत्या जिन्याजवळ झटपट स्कायवाॅकवर जाऊ या विचाराने असते, पण सरकात जिना बंद असल्याने पायऱ्या चढत प्रवाशांना जावे लागते. फलाट क्रमांक पाचवर कल्याण दिशेने चढ, उतार करणारा सरकत्या जिन्याची गरज आहे, असे प्रवासी सांगतात.
फलाट क्रमांक पाचच्या बाजुला पाटकर रस्त्याच्या कोपऱ्यावर कैलास लस्सी दुकानाजवळ उदवाहन आहे. हे उदवाहन अनेक वेळा बंद असते. पावसाळ्यात पाटकर रस्ता, डाॅ. राॅथ रस्त्यावर पाणी तुंबले की पावसाचे पाणी या उदवाहनमध्ये घुसून ते बंद पडते. अनेक दिवस ते बंद केले जात नसल्याने प्रवाशांना पायऱ्यांचा आधार घेऊन फलाटावर जावे लागते.
आसनगावलाही पायपीट
आसनगाव, कल्याण रेल्वे स्थानकातील सरकते जिने अनेक वेळा बंद असतात. मध्य रेल्वे प्रशासनाने सरकते जिने असलेल्या भागात कायमस्वरुपी तंत्रज्ञ नियुक्त करावा. सरकता जिना बंद झाला की तातडीने त्या जिन्याची त्यांना दुरुस्ती करता येणार आहे. अनेक वेळा सरकता जिना बंद राहतो. मुंबईतून तंत्रज्ञ येईपर्यंत एक ते दोन दिवस उशीर लावला जातो. तोपर्यंत प्रवाशांची हैराणी होते. यामध्ये रुग्ण असलेल्या प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो. आसनगाव रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.
रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद पडण्याचे प्रकार वाढत आहेत. सरकता जिना बंद पडला की तातडीने तो दुरूस्त होणे अपेक्षित आहे. जोपर्यंत प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनेचा पदाधिकारी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार करत नाही तोपर्यंत हे सरकते जिने दुरुस्त केले जात नसल्याची परिस्थिती आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. हे जिने नियमित सुरू राहतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी.
- लता अरगडे अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.
कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वेने सरकते जिने बसून प्रवाशांची सोय केली आहे. टिटवाळा, आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा ही सर्वाधिक प्रवासी वर्दळीची ठिकाणे आहेत. या रेल्वे मार्गावरील ज्या स्थानकांत सरकते जिने आहेत ते दैनंदिन सुरू राहतील. आणि बिघडले तर तातडीने दुरुस्त होतील अशी व्यवस्था रेल्वेने करावी.
- शैलेश राऊत अध्यक्ष, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना
