Central Railway local Trains Running 30 Mins Late: कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल बुधवारी सकाळपासून २५ ते ३० मिनीट उशिराने धावत आहेत. तप्त वातावरणामुळे अंगाची काहिली, त्यात घामाने भिजलेले शरीर आणि त्यात लोकल उशिराची भर पडत असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. मागील तीन दिवसांपासून हा गोंधळ सुरू आहे.

सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर कल्याणकडे जाणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा घसरला. यामुळे सोमवारी दिवसभर उपनगरीय रेल्वे सेवा उशिराने धावत होती. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे सोमवारी उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील डबा घसरलेल्या भागातील रूळ सुस्थितीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. डबा रूळावरून घसरल्याने रेल्वे मार्गातील अनेक स्लीलपर चाकाने चिरून काढले होते. रेल्वे मार्ग विस्कळीत केला होता. हे काम मंगळवारीही सुरूच होते.

त्यामुळे मंगळवारीही लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. नियमितची लोकल मिळत नसल्याने प्रवाशांची चिडचिड सुरू होती. बुधवारी तरी लोकल सेवा सुरळीत असेल असा विचार प्रवाशांनी केला होता. याऊलट बुधवारी सकाळपासून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती.

अर्धा तास लोकल उशिराने धावत असल्याने, पाठमागील लोकल कधी येईल याची शाश्वती नसल्याने मिळेल ती लोकल पकडण्याकडे प्रवाशांना कल होता. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती.

कल्याण, डोंबिवली या सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांमध्ये बुधवारी सकाळी हे गर्दीचे दृश्य होते. डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी ८.२६ ची बदलापूर-ठाणे लोकल अनेक प्रवाशांनी पकडून ठाण्यापर्यंत प्रवास केला. ही लोकल अनियमित वेळेत संथगतीने धावत असल्याने ठाणे येथे ही लोकल सकाळी ९.२० वाजता पोहचली. या लोकलमधील प्रवाशांनी ठाणे येथून मग इतर लोकलने मुंबईचा प्रवास केला.

उपनगरीय रेल्वे सेवा उशिराने धावत असताना येणाऱ्या लोकलची फलाटावर उद्घोषणा झाली की मध्येच लांब पल्ल्याची एखादी एक्सप्रेस काढली जात होती. त्यामुळे प्रवाशांचा संताप होत होता. उपनगरीय रेल्वे सेवा उशिराचे हे रडगाणे किती दिवस चालणार आहे, असे प्रवाशांचे प्रश्न आहेत. पश्चिम रेल्वेप्रमाणे उपनगरीय रेल्वे सेवा निश्चित वेळेत धावेल यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न करावेत. रेल्वे प्रवासी संघटनांनी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.