Mumbra Thane Train Accident : नोकरदार वर्गाचे शहर असलेल्या बदलापूर, अंबरनाथ या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढली आहे. मात्र येथील रेल्वे सुविधा, लोकलची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे सकाळी पाच वाजल्यापासून थेट अकरा वाजेपर्यंत येथून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या गर्दीने खचून भरतात. दुपारी चारनंतर बदलापूर, अंबरनाथ शहराकडे येणाऱ्या लोकलची अशीच स्थिती असते. दररोज अनेक जण पडतात, काही जखमी होतात, रोज चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती असते. मात्र लोकलची संख्या वाढत नसल्याने प्रवाशांना दररोज हाच जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे लोकल हाल कधी संपणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ झालेल्या अपघातात आज काही लोक मृत्यूमुखी पडली. पण गर्दीमुळे रोजच अपघाताची भीती असते. ज्या दिवशी सुखरूप लोकलमध्ये चढतो, तो दिवस आपला, अशा उद्वीग्न भावना बदलापुरचे रेल्वे प्रवासी आता व्यक्त करतात. बदलापूर रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. सकाळी पाच वाजल्यापासून येथून सुटणाऱ्या आणि कर्जत, खोपोलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दीने भरलेल्या असतात. अशा स्थितीती बदलापूर रेल्वे स्थानकातून चढताना दररोज चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होते, असे रोज प्रवास करणारे प्रवासी मयुरेश रोडगे सांगतात.

रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसतो आहे. सध्या बदलापूर स्थानकात काय काम सुरू आहे, ते किती दिवस चालणार आहे, नेमके काय केले जाते आहे काही कल्पना प्रवाशांना द्यावीशी रेल्वे प्रशासनाला वाटत नाही. स्थानकातील फटाल क्रमांक तीन आणि एक वर गाडी थांबण्याची जागा तीन वेळा बदलण्यात आली आहे. आता फलाट क्रमांक तीनची लोकल कर्जतच्या दिशेने थांबवली जाते. तिथे लोकलमध्ये चढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.

रोजच चेंगराचेंगरीची स्थिती असते, असेही मयुरेश यांनी सांगितले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून लोकल उशिराने धावण्याचे प्रकार वाढले आहेत. आधीच बदलापुरसारख्या स्थानकाची क्षमता कमी आहे. त्यात एखादी लोकल पाच मिनीटे जरी उशिराने आली की पुढच्या लोकलचे प्रवासी स्थानकात येतात. त्यामुळे स्थानकात अभूतपूर्व गर्दी होत असते.

बदलापूर स्थानकातही अशीच काहीशी स्थिती सायंकाळच्या वेळी झालेली असते. मुंबई, उपनगरातून परतीचा प्रवास करून आलेल्या बहुतांश प्रवास लटकंती करत झालेला असता. त्या स्थानकात उतरल्यानंतर फलाटावर मोठी गर्दी असते. त्यामुळे बदलापुरकरांच्या नशिबी त्रास कायम आहे.

रोजच अपघात, रोजच जखमी

गेल्या काही महिन्यात बदलापुरात गर्दी वाढली आहे. प्रवास करताना लोकलमध्ये चढताना रोजच कुणीतरी जखमी होत असते. दोनच दिवसांपूर्वी सकाळी ६.५२ मिनिटांच्या लोकलमध्ये चढताना एक प्रवासी गर्दीमुळे खांबाला धडकला. त्यामुळे त्यांचे नाक फुटले आणि ते रक्तबंबाळ झाले. पण रोजच कुणाला तरी काहीतरी लागत असते. लोकलचा प्रवास आता सुखरूप राहिलेला नाही. या अपघातात आपणही कधीतरी येऊ शकतो अशी भीती कायमच मनात प्रवास करताना असते. – मनोहर एन. , प्रवासी, बदलापूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांना गृहित धरलंय

आम्ही सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे रेल्वेच्या समस्या, गर्दीची स्थिती आणि नव्या लोकल गाड्यांची मागणी करतो. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आम्ही रेल्वे मंत्री, रेल्वेचे व्यवस्थापक अशा सर्वांना निवेदन दिले आहे. मात्र प्रवाशांना गृहित धरले जाते आहे. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना