ठाणे : मध्य रेल्वेच्या दिरंगाईचे वेळापत्रक मे महिन्याच्या आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी उशीराने होते. अनेक लोकलची वाहतुक १० ते २० मिनीटे उशीराने होती. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना वेळेत पोहचता आले नाही.
मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक अत्यंत महत्त्वाची आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा भागातून नोकरदार मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. मे महिन्याच्या पहिल्याच सोमवारी तांत्रिक कारणामुळे रेल्वेची वाहतुक उशीराने सुरु होती.
कोणत्या गाड्या उशीराने
- डोंबिवली स्थानकातून सकाळी ७.४७ वाजता मुंबई सीएसएमटीच्या दिशेने सुटणारी धिमी लोकल सकाळी ९.१५ वाजता करीरोड स्थानकात होती. ही लोकल सकाळी ९.०९ वाजता पोहचणे अपेक्षित होते.
- कर्जत येथून सकाळी ८.१४ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी जलद लोकल २० मिनीटे उशीराने होती. ८.५८ वाजता सीएसएमटीला ही लोकल पोहचणे अपेक्षित होते. परंतु सकाळी ९.१९ वाजता ही रेल्वे मस्जिद बंदर आणि सीएसएमटी स्थानका दरम्यान होती.
- आसनगाव ते सीएसएमटी ही सकाळी ८.१८ वाजताची धिमी लोकल उशीराने धावत होती. ९.०४वाजता ही लोकल चिंचपोकळी स्थानकात असणे अपेक्षित होते. परंतु ९.२२ वाजता ही लोकल करीरोड स्थानकात होती.
- ठाणे रेल्वे स्थानकातून सकाळी ८.२० मिनीटांनी सुटणारी ठाणे-सीएसएमटी जलद रेल्वेगाडी २७ मिनीटे उशीराने होती. ही लोकल सकाळी ८.५६ वाजता भायखळा स्थानकात पोहचणे अपेक्षित होते. परंतु सकाळी ९.२४ वाजता ही लोकल भायखळा स्थानकात पोहचली.
- कल्याण ते परळ ही सकाळी ८.२२ वाजताची धिमी लोकल २० मिनीटे उशीराने होती. सकाळी ९.०३ वाजता ही लोकल परळ स्थानकात पोहचणे अपेक्षित होते. परंतु सकाळी ९.२४ मिनीटांनी ती परळ स्थानकात पोहचली.
- अंबरनाथ-सीएसएमटी ही सकाळी ८.२६ वाजताची जलद रेल्वेगाडी २० मिनीटे उशीराने होती. ही रेल्वेगाडी सकाळी ९.०९ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहचणे अपेक्षित होते. परंतु ९.२९ वाजता लोकल सीएसएमटी स्थानकात पोहचली.
यासह मुंबईहून डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा भागात धावणाऱ्या लोकलची वाहतुकही उशीराने सुरु होती. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.
