पावसाळय़ात रेल्वे रुळांत पाणी साचून लोकलसेवा विस्कळीत होण्याच्या घटना या आता सवयीच्या होऊ लागल्या आहेत. मध्य रेल्वेवरील विस्कळीतपणा अलीकडे दर आठवडय़ाला पाहायला मिळतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळय़ापूर्वीच सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दावे मध्य रेल्वेकडून केले जात असले, तरी त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.  
यंदा मध्य रेल्वेने जानेवारीपासूनच टप्प्याटप्प्याने पावसाळ्याची पूर्वतयारी सुरू केली. नालेसफाईखेरीज रेल्वेमार्गातील कचरा व डेब्रिज तसेच कित्येक टन जुन्या सामानाची विल्हेवाट लावण्यात आली. कच्चे-पक्के नाले बनविण्याशिवाय सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे ठरावीक सखल भागात पंप तैनात ठेवले जाणार आहेत.
तरीही यंदा पावसाळ्यात रेल्वेमार्गात पाणी तुंबल्याने किंवा सिग्नल यंत्रणा निकामी झाल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीस अशाच उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही गेल्या वर्षी पावसाने मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेचे तीन तेरा वाजले होते. सबंध पावसाळ्यात चार ते पाच वेळा त्याची पुनरावृत्ती होऊन, प्रवाशांवर रेल्वेमार्गातून ठेचकाळत मार्ग काढण्याची वेळही आली होती. सखल भागांत पाणी साचल्याने व सिग्नल यंत्रणा नादुरुस्त झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
ठाण्यापलीकडच्या स्थानकांमध्ये जागोजागी डेब्रिज व कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील रेल्वेमार्गाजवळच्या नाल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. दिवा, कळवा भागातील नाला अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने तेथे पाणी भरण्याची शक्यता मोठी आहे. तर पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामाचे साहित्यसुद्धा रेल्वे रुळालगतच अस्ताव्यस्त पडलेले आहे. कळव्यालगत असलेला चिंधी नाला तुंबून मध्य रेल्वे खंडित होण्याचे प्रकार गेली पाच वर्षे सातत्याने घडत आहेत. या नाल्यालगत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू होताच आणि समुद्राला भरती असेल तर चिंधी नाल्याचे पाणी कळवा स्थानकात शिरते. यंदाही या नाल्यालगतची अतिक्रमणे कायम आहेत. त्यामुळे चिंधी नाला यंदाही प्रवाशांची वाट अडवेल, ही भीती कायम आहे.
रेल्वे स्थानकांवर धबधब्यांचा अनुभव..
मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील छतांची अवस्था अत्यंत दुर्लक्षित असून अनेक स्थानकांत अक्षरश: धबधबे कोसळत असल्याचे चित्र निर्माण होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरसह कर्जत आणि कसाऱ्यापर्यंतच्या सगळ्याच स्थानकांची ही परिस्थिती असून या समस्येवर रेल्वेला अद्याप उत्तर सापडलेले नाही. शिवाय जुन्या लोकलमधून होणारा जलाभिषेकही यंदा कायम राहण्याची शक्यता आहे.
सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण..
रेल्वे रुळांलगत दोन हजाराहून अधिक संवेदनशील भाग असून १५००हून अधिक ठिकाणी अवघ्या काही क्षणात पाणी भरते. या भागामध्ये सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. या भागात रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्यानंतरही व्यवस्थित काम करणारी अधुनिक सिग्नल यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
‘डिजिटल अ‍ॅक्सेल काऊंटर’ सिग्नलच्या माध्यमातून हे तांत्रिक बिघाड टाळता येऊ शकणार आहेत. सिग्नल नादुरुस्त होण्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला, तरी कचरा अडकल्याने किंवा अन्य कारणांमुळे रेल्वे रूळ नादुरुस्त होण्याची समस्या कायम आहे. त्यावर मध्य रेल्वेला कोणताही उपाय अद्याप सापडलेला नाही.
कर्मचाऱ्यांची डोकेदुखी
पावसाळा सुरू झाला की गँगमन, किमॅन, दुय्यम मदतनीस आणि गस्तिपथक यांची कामे जोमाने सुरू होतात. पावसाळ्यात पाणी साचल्यास रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या नाल्यांमधून मोठय़ा प्रमाणात येणारा कचरा तसेच सांडपाण्यात या कामगारांना काम करावे लागते. या अडचणींवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कामगारांना प्रत्येक वर्षी पावसाळी गणवेश देण्यात येतो.
पण दरवर्षी ४५० टनाहून जास्त कचरा रेल्वेमार्गावर येत असल्याने हा कचरा या कामगारांसाठी पावसाळ्यात डोकेदुखी ठरतो. कल्याणपलीकडे रेल्वे रुळाखालून माती वाहून जाण्याचे प्रकार घडत असल्याने अपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असते. मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे स्थानकापुढील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली या भागात प्रचंड धक्के बसतात.
या ठिकाणची रेल्वेची जमीन ही दलदलीची आहे. तसेच या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्याचप्रमाणे कळवा ते डोंबिवली दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूलाच असणाऱ्या खाडीतून रेती, वाळू उपसा करण्यात येत असल्यामुळेही रेल्वेच्या रुळांना थोडा धोका पोहोचत आहे. हा टाळण्यासाठी इथे रेल्वेकडून कॉंक्रीटचे बंधारे घातले जात आहेत.