ठाणे : मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेच्या दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इतर प्रवासी घुसखोरी करत असून या घुसखोरांमुळे दिव्यांग प्रवाशांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही घुसखोरी रोखण्यासाठी आता दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात केले जाणार असून हे जवान घुसखोर प्रवाशांवर कारवाई करणार आहेत.

मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित डबा असतो. या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इतर प्रवासी घुसखोरी करत आहेत. त्याचा त्रास दिव्यांग प्रवाशांना होत आहे. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याकडे निवेदन देऊन ठोस उपाययोजनांची मागणी केली होती.

दिव्यांग डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडून तात्काळ दंड वसूल करणे, वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर अधिक कठोर दंडाची तरतूद करणे, प्रत्येक स्थानकावर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृतीपर सूचना देणे, प्रत्येक डब्यात दिव्यांग आरक्षित डब्याबाबत सूचना प्रसारित करणे, तिकीट खिडक्यांसमोर आणि दिव्यांग डब्याजवळ मोठे माहितीफलक लावणे तसेच दिव्यांग डबे अधिक ठळक पद्धतीने ओळखता येतील अशी चिन्हे लावण्याची मागणीही खासदार म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.

या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाने घुसखोर प्रवाशांना रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार, दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवानांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे दिव्यांग प्रवाशांना सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता येणार असून घुसखोर प्रवाशांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती खासदार म्हस्के यांनी दिली आहे. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षित, सुलभ प्रवासासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.