ठाणे : मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वेची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळ आणि सायंकाळच्यावेळेत लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अनेकदा गर्दीमुळे अनेक प्रवाशांचे प्राण जातात. मात्र, लोकल प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये १५ डब्बे लोकल गाड्या चालवण्यात येणार असून स्थानकांच्या विस्तारिकरणाचे काम देखिल प्रशासनाने हाती घेतले आहे.
मध्य रेल्वे अनेक प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. या रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. जलद तसेच धिम्या लोकल गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. रोजचा रेल्वे प्रवास काही प्रमाणात सुखकर व्हावा या उद्देशाने प्रशान विविध उपयायोजना राबवत असते. यामध्ये प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची वाहतूक होणार आहे. यामध्ये जलद आणि धिम्या या दोन्ही मार्गिकांवर या लोकल गाड्या धावणार आहेत. तसेच, डिसेंबर २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या २७ स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर १५ डब्यांच्या लोकल मार्गिकावर आणल्या जाणार आहेत. सर्वप्रथम १२ डब्यांच्या लोकल गाड्या या१५ डब्यांच्या केल्या जातील. यामध्ये टप्प्याटप्यांनी वाढ होणार आहे.
मध्य रेल्वेच्या ३४ स्थानकांच्या विस्तारिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील २७ स्थानकांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या विस्तारिकरणामुळे १५ डब्ब्यांच्या लोकल चालविणे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांची क्षमता देखिल वाढण्याची शक्यता आहे. विस्तारिकरणामध्ये सर्वाधिक स्थानके ही कल्याण ते खोपोली आणि कसारा या मार्गिकेवरील असणार आहेत.
मध्य रेल्वेच्या स्थानकांपैकी ३४ रेल्वे स्थानकांतील फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यातील २७ स्थानकांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या स्थानकांचे होणार विस्तारिकरण मध्ये रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गावरील विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, शैलू, बदलापूर, भिवपुरी, पळसदरी, कर्जत, खोपोली तर कसारा मार्गावरील आंबिवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, कसारा, टिटवाळा आणि ठाणे कल्याण मधील मुंब्रा, कळवा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकांसह अन्य स्थानकांचा समावेश आहे. तर ७ स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये मुंबई ठत्रपती शिवाजी महाराज ( सीएसएमटी), ठाणे, कल्याण, डोंबिवली, वांगणी, खडावली स्थानकांचा समावेश आहे. या विस्तारिकरणामुळे प्रवाशांचा प्रवास काही प्रमाणावर सुखकर होणार आहे.
