बदलापूर: नेरळ आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ”एक्स” या समाजमाध्यमावरून यासंदर्भात ताजी माहिती दिली आहे. यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या दुसरीकडे वळवण्यात आल्या होत्या. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे नेरळ आणि भिवपुरी दरम्यान रुळांवर पाणी साचले होते.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. अवघ्या सव्वा तासातच, म्हणजेच सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी रुळांवरील पाणी यशस्वीरीत्या काढण्यात आले आणि या मार्गावरील रेल्वे सेवा सुरक्षितपणे पूर्ववत करण्यात आली. सकाळच्या वेळी रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक थांबवावी लागली होती. आता मार्ग मोकळा झाला असला, तरी या सकाळच्या व्यत्ययाचा फटका उपनगरीय लोकल सेवेला बसला आहे. सध्या कर्जत-बदलापूर ते मुंबई मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
ऐन गर्दीच्या वेळी गाड्या विलंबाने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि विद्यार्थ्यांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे रुळावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले होते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी अधिकृत ॲपवर आपल्या गाड्यांच्या सुधारित वेळा नक्की तपासून घ्याव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसात रेल्वे सेवेला पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या सात दिवसात अनेकदा रेल्वे सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यात कर्जत, माथेरान, नेरळ, बदलापूर या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांची चिंता वाढवली आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास रेल्वे सेवा परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात येते आहे.
