Lunar Eclipse 2026 Date and Time In Maharashtra: या वर्षी २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण ३ मार्च रोजी लागणार आहे. यादिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार असून हे चंद्रग्रहण एक नैसर्गिक अविष्कार आहे. हे चंद्रग्रहण सर्वांनी साध्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. हे चंद्रग्रहण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षीचे चंद्रग्रहण चूडामणी योगात लागणार असून, त्या दिवशी आकाशात ब्लड मूनचे अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे. ब्लड मूनमुळे त्या रात्री आकाश निळ्या आणि गडद लाल रंगात दिसेल असा अंदाज काही पंचागकर्त्यांनी वर्तविला आहे. या चंद्रग्रहणाविषयी गेले काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच प्रसारमाध्यमांवर गैरसमज आणि भिती पसरविली जात आहे. याबाबत दा.कृ सोमण म्हणाले की, ‘चंद्रग्रहणाबाबत जी भिती पसरवली जात आहे, हे अतिशय चुकीचे आहे, सध्याचा काळ हा विज्ञानाचा आहे. या काळात शिक्षक तसेच पालकांनी मुलांना स्वत:हून चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती दिली पाहिजे.’

चंद्रग्रहणास प्रारंभ केव्हा होईल ?

जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते तेव्हा चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्र दृश्य आकाशात असतो तेथून ते चंद्रग्रहण दिसते. मंगळवार, ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. परंतू, त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही. तो पूर्व क्षितिजाखाली असेल. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्यावेळी ग्रहणातच चंद्र उगवतांना दिसणार आहे, असे सोमण म्हणाले.

या शहरांतून यावेळी दिसणार चंद्रग्रहण…

मंगळवारी, ३ मार्च रोजी ६ वाजून ४८ मिनिटांनी या एकाचवेळी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे चंद्रग्रहण दिसणार आहे. मुंबई येथे चंद्रोदय सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी होणार असल्यामुळे मुंबईत फक्त ३ मिनिटे चंद्रग्रहण दिसेल. पुणे येथे ६ वाजून ४१ मिनिटांनी, नाशिक येथे ६ वाजून ४० मिनिटांनी, कोल्हापूर येथे ६ वाजून ४० मिनिटांनी,नागपूर येथे ६ वाजून १८ मिनिटांनी, सोलापूर येथे ६ वाजून ३३ मिनिटांनी, रत्नागिरी येथे ६ वाजून ४४ मिनिटांनी, छत्रपती संभाजी नगर येथे ६ वाजून ३४ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यानुसार, सर्वत्र ठिकाणी चंद्रोदयापासून ६ वाजून ४८ मिनिटा पर्यंत चंद्रग्रहण दिसणार आहे, अशी माहिती दा.कृ सोमण यांनी दिली.