ठाणे – येत्या मंगळवारी, ३ मार्च रोजी लागणाऱ्या चंद्रग्रहणाबाबत समाजमाध्यमांवर तसेच प्रसार माध्यमातून अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. त्यात, यंदाचे चंद्रग्रहण हे धुलीवंदनच्या दिवशी लागणार असल्यामुळे धुलीवंदन साजरे करता येणार नाही असा समज देखील अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. परंतू, ग्रहणाच्या दिवशी धुलिवंदन साजरे करणे हे शुभ असल्याचे खगोल शास्त्रज्ञ आणि पंचागकर्ते दा.कृ सोमण यांनी सांगितले.
२०२६ मधील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च रोजी लागत आहे. यादिवशी धुलिवंदन सुद्धा आहे. परंतू, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. तर, सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणात सुतक काळ पाळावा असा संदेश गेले काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे. काही पंचागकर्त्यांनी असे ही सांगतिले आहे की, चंद्रग्रहणाच्या दिवशी धुलिवंदन खेळणे शुभ नाही. ग्रहण धुलिवंदनच्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी सुटणार आहे. त्यामुळे सूतक आणि ग्रहणाच्या प्रभावात रंग-गुलाल खेळणे शुभ मानले जात नाही, म्हणून ३ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाणार नाही. त्यामुळे धुलिवंद ४ मार्च रोजी साजरी करावी, असा दावा काही पंचागकर्त्यांनी केला असून हा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
या चंद्रग्रहणा विषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहे. हे गैरसमज चुकीचे असल्याचे खगोल शास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, हे पहिले वर्षे नाही की, होळी किंवा धुलिवंदनच्या दिवसात ग्रहण लागले आहे. याआधी देखील होळी धुलिवंदनच्या दिवशी ग्रहण लागले होते. त्यामुळे ग्रहणाच्या काळात धुलिवंदन सण साजरा करु नये हा गैरसमज आहे. ग्रहणवेधकाळात धूलीवंदन साजरा करणे शुभ आहे, असे सोमण यांनी सांगितले.
