ठाणे : ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली. येणार नसशील तर ठोकून काढू, आई-वडिलांना पाहून घेऊ,’ असा दावा विद्यार्थी आंदोलक नेते अभिजित दिपके यांनी केला आहे. या आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून तुम्हाला कोणी धमकी दिली, त्याचे नाव सांगा. नाव सांगता येत नसेल तर बदनामी करू नका, असा थेट इशारा त्यांनी दिपकेंना दिला आहे.
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून धमकी आणि पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याचा दावा करणारे विद्यार्थी आंदोलक नेते अभिजित दिपके यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दिपके यांनी जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती. ‘तुम्ही या, नाही तर ठोकून काढू,’ तसेच आई-वडिलांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. कितीही ऑफर दिल्या तरी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलास धमक्या देत आहात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा मी आहे. ३० वर्षाच्या मुलास तुम्ही किती धमक्या देणार आहेत, असेही ते म्हणाले. ‘जेन झी’ संस्कृती बिघडवत असल्याच्या बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचाही दिपके यांनी समाचार घेतला. आमच्या हक्काच्या मागण्यासाठी लढणे बननामी आहे. आणि असे असेल तर ते आम्ही बघून घेऊ.
रामदेवबाबांनी आपल्या प्रोडक्ट विकण्याकडे लक्ष द्यावे. असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरुवारी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. भाजपची देशभरात कोट्यवधी सदस्य संख्या आहे. त्यामुळे दिपके यांना नेमके कोणी धमकी दिली, त्याचे नाव त्यांनी स्पष्टपणे सांगावे. संबंधित व्यक्तीचे नाव सांगता येत नसेल तर भाजपची बदनामी करू नये, असे बावनकुळे यांनी सुनावले. त्यामुळे दिपके यांच्या आरोपांवरून आता भाजपकडूनही आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
