ठाणे – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या ‘ॲट होम’ या स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक, कृषिरत्न चंद्रशेखर हरि भडसावळे यांचा समावेश आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने त्यांना हे विशेष निमंत्रण पाठविण्यात आले असून, ही निवड रायगड सह ठाणे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
चंद्रशेखर भडसावळे हे १९७६ पासून कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. चंद्रशेखर भडसावळे यांनी शेतीकडे केवळ उत्पादनाचे साधन म्हणून न पाहता, निसर्गाशी सुसंवाद साधणारी जीवनपद्धती म्हणून पाहिले. त्या काळात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर शेतीला मारक ठरत असताना, त्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारत प्रयोगशील पद्धतीने नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. या प्रयोगशीलतेतूनच नैसर्गिक शेती, शून्य-नांगरणी तंत्र (एसआरटी), जलसंवर्धन, मृदासंवर्धन आणि एकात्मिक शेती व्यवस्थापन या संकल्पनांचा जन्म झाला. शेतीत उत्पादनवाढीसोबतच जमिनीचे आरोग्य जपणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्याचा खर्च कमी करणे, हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले.
‘सगुणा बाग’ एक यशस्वी उपक्रम – कर्जत जवळील नेरळ येथे वसलेली ‘सगुणा बाग’ ही आज केवळ एक शेती प्रकल्प न राहता, जागतिक दर्जाचे एकात्मिक शेती मॉडेल म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी भातशेतीसोबत मत्स्यव्यवसाय, वनशेती, फलोत्पादन, भाजीपाला लागवड, गो-पालन, सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटन यांची यशस्वी सांगड घालण्यात आली आहे.
या मॉडेलमुळे एका एकरात केवळ एका पिकावर अवलंबून न राहता, वर्षभर सातत्यपूर्ण उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करता येतात, हे सगुणा बागेने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे शेती ही केवळ पावसावर अवलंबून असलेली जोखीम न राहता, नियोजनबद्ध आणि शाश्वत व्यवसाय ठरू शकते, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
सगुणा बागेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कृषी पर्यटन. शहरी भागातील नागरिकांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देतानाच, ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे पर्याय निर्माण झाले आहेत. स्थानिक युवक, महिला बचत गट आणि कारागीर यांना यामधून आर्थिक आधार मिळत आहे.चंद्रशेखर भडसावळे यांचा हा प्रकल्प आहे. आज सगुणा बाग ही देश-विदेशातील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, विद्यार्थी, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी अभ्यासाचे केंद्र ठरली आहे. येथे नियमितपणे प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि अभ्यास दौरे आयोजित केले जातात. अनेक विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी सगुणा बागेच्या मॉडेलचा अभ्यास केला असून, ते अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात आले आहे.
शून्य-नांगरणी तंत्राने (एसआरटी) घडवलेली क्रांती – चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसित केलेले शून्य-नांगरणी तंत्र हे विशेषतः भातशेतीसाठी क्रांतिकारक मानले जाते. या तंत्रात जमिनीची खोल नांगरणी टाळली जाते, ज्यामुळे मृदासंरचना अबाधित राहते, सेंद्रिय घटकांचे संवर्धन होते आणि पाण्याची बचत होते. या तंत्रामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय घट, मजुरीवरील अवलंबित्व कमी, कमी पाण्यात जास्त उत्पादन आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. असे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळत आहेत. आज हे तंत्र महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत स्वीकारले जात असून, हजारो शेतकरी त्याचा यशस्वी वापर करत आहेत.
