नोकरभरती तसेच विविध कामांनिमित्ताने लागणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ठाणे पोलिसांनी आता अर्जदारांना थेट ई-मेलद्वारे हे दाखले पाठवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे अशा दाखल्यांसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात मारावे लागणारे हेलपाटे टळणार आहेत आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शी व जलद होणार आहे.
एखाद्या व्यक्तीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत किंवा नाहीत, संबंधित व्यक्तीला गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे का, याची माहिती त्याच्या चारित्र्य पडताळणी दाखल्यामधून समजते. यामुळे नोकरभरतीकरिता किंवा विविध कामांनिमित्ताने चारित्र्य पडताळणीचा दाखला मागितला जातो. चारित्र्य पडताळणी दाखल्याकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराची स्थानिक पोलिसांकडून माहिती गोळा करून त्याआधारे पोलीस आयुक्तालयामार्फत दाखला देण्यात येतो. स्थानिक पोलिसांसोबत आयुक्तालय क्षेत्रातील अन्य पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत का, याचीही माहिती घेतली जाते. त्यातच या प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि लाचखोरीचे प्रकार यांमुळे हा दाखला मिळवण्यासाठी अर्जदारांना बरीच प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु, आता २१ दिवसांत हा दाखला देण्याचे पोलिसांनी ठरवले आहे.
चारित्र्य पडताळणी दाखल्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी ऑनलाइन अर्जस्वीकृती सुविधा सुरू केली. नागरिकांना याबाबत ज्ञान नसल्याने सुरुवातीला कार्यालयातही अर्ज स्वीकारले जात होते. मात्र, या महिन्यापासून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे दाखला घेण्यासाठीदेखील पोलीस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नाही. हा दाखला अर्जदाराच्या ‘ई-मेल’वर पाठवण्यात येईल. त्यामुळे दाखला मिळण्याची मुदत २१ दिवसांपेक्षाही कमी होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
नीलेश पानमंद, ठाणे

चारित्र्य पडताळणी दाखला मिळविण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत ऑनलाइनद्वारे ७८९ अर्जदारांनी अर्ज दाखल केले असून त्यांपैकी साडेतीनशेहून अधिक अर्जदारांना दाखले देण्यात आले आहेत. ऑनलाइनद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत असले तरी दाखला घेण्यासाठी अर्जदाराला कार्यालयात यावे लागते. यामुळे दाखल्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइनद्वारे राबविण्यासाठी अर्जदारांना थेट ई-मेलवर दाखला पाठविता येऊ शकतो का, याचे प्रयत्न सुरू आहेत.
– सचिन पाटील, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त